
मानखुर्द येथे शुक्रवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास लागलेली भीषण आग तब्बल 21 तासांनी नियंत्रणात आली. दुसऱया दिवशी आग चारही बाजूंनी नियंत्रणात आली असली तरी रात्रीपर्यंत कूलिंग ऑपरेशन सुरूच होते. दरम्यान, आगीसंदर्भात अग्निशमन दल आणि पोलिसांकडून चौकशी सुरू झाली असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली.
मानखुर्द मंडाळे येथे मोठय़ा प्रमाणात बेकायदेशीर भंगार गोदामे असल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकाराबाबत स्थानिक लोकप्रतिनिधींनी जिल्हाधिकाऱयांकडे तक्रारीही केल्या आहेत. तरीही वारंवार आगीचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे या गोदामांचे ऑडिट करण्यासाठी जिल्हाधिकाऱयांना पत्र लिहिणार, सूचना देणार असल्याचे महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितले.
… तर अशा जागा पालिकेच्या ताब्यात द्या! – महापौर
मानखुर्द मंडाळे येथे कलेक्टर लँड असलेल्या या जागेत मोठय़ा प्रमाणात बेकायदेशीर भंगार गोदामे असल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकाराबाबत स्थानिक लोकप्रतिनिधींनी जिल्हाधिकाऱयांकडे तक्रारीही केल्या आहेत. तरीही वारंवार आगीसारख्या दुर्घटनांचे प्रकार घडत आहेत. अशा वेळी आपत्कालीन स्थितीवर नियंत्रणात आणण्यासाठी पालिकेची यंत्रणा कामाला लागते. त्यामुळे अशा जागांवर नियंत्रण ठेवता येत नसेल तर संबंधित प्राधिकरणांनी या जागा नियंत्रणासाठी पालिकेच्या ताब्यात द्याव्यात आणि पालिकेला त्याचा मोबदला द्यावा असे महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितले आहे. संबधित प्रकाराबाबत आणि भूमाफियांचा बंदोबस्त करण्यासाठी जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्तांना पत्र देणार असल्याचेही त्या म्हणाल्या.




























































