
कोरोना नियंत्रणात आल्यामुळे मुंबईतील हॉटेल, रेस्टॉरंट, बार, बँक्वेट हॉल आणि फूड कोर्ट सकाळी 7 वाजल्यापासून मध्यरात्री 1 वाजेपर्यंत सुरू ठेवता येणार आहेत. तर दुकाने सकाळी 7 ते रात्री 11 पर्यंत आणि वाइन शॉप सकाळी 10 ते रात्री 10.30 पर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी याबाबत परिपत्रक काढून नियमावली जाहीर केली आहे.
ऑक्टोबरच्या मध्यावर जाहीर करण्यात आलेल्या नियमावलीनुसार हॉटेल, रेस्टॉरंट, बार सकाळी 7 ते रात्री 11.30 पर्यंत सुरू ठेवण्यात परवानगी देण्यात आली होती. तर दुकाने आणि व्यापारी आस्थापनांना सकाळी 7 ते रात्री 9.30 पर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली होती. मात्र आता लॉकडाऊन 28 फेब्रुवारीपर्यंत वाढवण्यात आला असला तरी हॉटेल, रेस्टॉरंटसाठी सुधारित वेळा आयुक्तांनी जाहीर केल्या.
राज्य सरकारने दुकाने व आस्थापने रात्री 11 वाजेपर्यंत तर हॉटेल 1 वाजेपर्यंत खुली ठेवण्याची परवानगी दिली असताना पोलिसांकडून मुंबईत काही ठिकाणी दुकाने, हॉटेल, बार बंद करण्याची कारवाई केली जात असल्यामुळे पोलीस आणि व्यावसायिकांमध्ये वाद होण्याचे प्रकार घडत होते.
कोरोना खबरदारी घ्या, अन्यथा कारवाई!
हॉटेल, बार, रेस्टॉरंट, दुकाने सुरू ठेवण्यास वेळ वाढवून मिळाला असला तरी संबंधित ठिकाणी कोरोना रोखण्यासाठी आवश्यक असणारी सर्व प्रकारची काळजी घेणे अनिवार्य राहणार आहे. यामध्ये सोशल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर, सॅनिटायझर अशा उपाययोजना केल्या नसल्याचे निदर्शनास आल्यास आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार कारवाई केली जाणार आहे.
































































