लेख – बदलती खाद्य संस्कृती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘पापाय शो’ नावाची इंग्लिश कार्टून फिल्म कधीतरी पाहिल्याचं आठवतंय. त्यातल्या काटकुळय़ा ‘पापाय’ला ‘स्पिनॅच’ म्हणजे पालकाची भाजी खाल्ल्यावर अचानक अचाट शक्ती यायची. ‘स्पायडरमॅन’ वगैरेसारखी ही फॅन्टॅसी कार्टून मालिका, परंतु त्यामागचा उद्देश लहान मुलांनी सकस भाज्यांचं सेवन करावं असा असल्याचं म्हटलं जायचं. मुलांना आवडीच्या व्यंगचित्र मालिकेतून उपयुक्त संदेश देणं ही अभिनव कल्पना. नंतरही काही कार्टून मालिकांत अशाच थीमचा आविष्कार दिसला.

मूळ प्रश्न चौरस आहाराचा. ज्या प्रदेशात ज्या हंगामात जे पिकतं, तेच तिथे वसलेल्या लोकांसाठी आरोग्यदायी असतं असं प्राचीन उपचार पद्धती सांगते. जोपर्यंत रेफ्रिजरेशनची म्हणजे शीतगृह किंवा घरोघरची शीत कपाटं (फ्रीज) अवतरली नव्हती, तोपर्यंत रोजचं शिजवलेलं अन्न शक्य तर त्याच दिवशी संपवलं जायचं. मोठय़ा संयुक्त कुटुंबात ते सहज जमत असेल. त्याचबरोबर त्या त्या मोसमातल्या भाज्या आणि फळंच त्या काळात बाजारातही मिळत. स्थानिक किंवा आसपासच्या पंचक्रोशीतून येणारं धान्य आणि फळं, भाज्या यांचा आस्वाद घेताना त्याचेच विविध पदार्थ बनवण्याची खाद्य संस्कृती अनुभवातून विकसित झाली.

आपल्याकडे पावसाळय़ात कोकणपट्टीत प्रचंड पाऊस पडतो. अशा वेळी येणाऱ्या पावसाळी भाज्या सहज उपलब्ध व्हायच्या. घराभोवतीच्या परिसरातच उगवणारा टाकळा किंवा रानात उगवणारी कर्टुल्यांसारख्या भाज्या आणि कंदमुळं बाजारात यायची. इतर ठिकाणीही त्या त्या भागात विकणारी धान्यंच रोजच्या आहाराचा भाग असायची. तुलनेने बेताच्या पाण्यावर होणारी ज्वारी, बाजरी, नाचणी, वरी अशी धान्यं आहारात प्रामुख्याने असायची. कडधान्यं, डाळी आणि पावसाळय़ासाठी खासकरून ठेवलेलं माशांचं सुकट, सोडे या गोष्टी चवीने चाखल्या जायच्या. जसजसं ऋतुचक्र बदलेल तसतसा आहार आपसूक बदलायचा.

उन्हाळय़ात आंबे, फणस, ओले काजू, कलिंगड अशी फळं यायची तर हिवाळय़ात द्राक्षं मंडईत दिसायला लागायची. केळी खूप होतात त्या भागात राजळी केळय़ांची सुकवलेली ‘सुकेळी’ मिळायची. एरवी बोरं, करवंद, खजूर, ताडगोळे, नारळ असा विविध चवदार पदार्थांचा आस्वाद घेता यायचा. कधी भुईमूग (शेंगदाणे) तर कधी ओल्या हरभऱ्याची जुडी आणून, मक्याची कणसे आणून ती भाजून खाण्याची गंमत असायची. उपासासाठी ओले शिंगाडेही मिळायचे.

काळ बदलला. एकोणिसाव्या शतकात यंत्रयुगाने गगनभरारी घेतली. अन्न साठवण करण्याला आधुनिक प्रक्रिया आल्या. आगगाडी, बस अशा वाहनांमुळे जलद वाहतुकीची सोय झाली आणि दूरचे खाद्यपदार्थ दोन-चार दिवसांत मिळू लागले. कश्मिरी सफरचंद, हिमाचलमधली स्ट्रॉबेरी किंवा केरळचे नारळ बाजारात सर्रास दिसू लागले. यंत्रयुगाने मोठय़ा शहरात कारखानेही आणले. त्यासाठी विविध प्रांतांतली माणसं आपापली खाद्य संस्कृती घेऊन इतरत्र जाऊ लागली.

आपल्या महाराष्ट्रातल्या पोहे, शिरा, सांजा, दशम्या अशा पदार्थांबरोबरच मेदुवडा, इडली, डोसा नव्याने उघडलेल्या उपाहारगृहात दिसू लागला. फरसाणाची दुकानं सजली. पारंपरिक भडंग आणि कांद्याची भजी, बटाटेवडे याबरोबर इंग्रजी राजवटीने सॅन्डविच, केक वगैरे पदार्थ आणले. भाकरी, चपाती, रोटी खाणाऱ्या देशात ब्रेड, पाव रोजच्या खाद्यान्नाचा भाग झाला.

जगाची गती आणखी वाढली. देशांतर्गत खाद्य पदार्थांच्या देवघेवीबरोबरच वेगवान ‘ग्लोबलायझेशन’ने जागतिक बाजारपेठ निर्माण केल्यावर जगभरच्या खाद्य संस्कृतीतही नकळत बदल झाले. नावीन्य म्हणून स्वीकारले गेले. इटालियन पिझ्झा, पास्ता, अमेरिकन बर्गर सहज उपलब्ध झाला. ऑस्ट्रेलियन गोड मका, न्यूझीलँडचं किवी फळ किंवा ब्रोकोली (हिरवा फ्लॉवर) अशा भाज्या मंडईत सुरुवातीला आल्यावर मागच्या पिढीला नवल वाटलं, पण नव्या पिढीला याच खाद्य पदार्थांची चव आवडू लागली. असं पिढी दरपिढी होतंच गेलं. ‘खवय्येगिरी’ला आता देश, काळाची सीमाच राहिली नाही.

मात्र वर्षानुवर्षांच्या अनुभवसिद्ध आहारातल्या काही आवश्यक गोष्टींचा विसर पडू लागला. सकस नाचणी, सातूचं पीठ, कडधान्यांचं नियमित सेवन, विविध डाळींमधून मिळणारी प्रथिनं आणि काही कच्च्या फळबियांमधून मिळणारं नैसर्गिक तेल याकडे दुर्लक्ष होऊ लागलं. त्यातच शहरी भागात बैठी कामं आणि ‘फॅट’ वाढवणारा आहार अशा सगळय़ाच दृष्टीने ‘व्यस्त’ जीवनात आहारातून काही आरोग्यविषयक समस्या उद्भवायला लागल्या.

शालेय पुस्तकात राहिलेला चौरस आहार पुन्हा लक्षात यावा म्हणून जागतिक जागृती सुरू झाली. त्यापैकीच एक म्हणजे दहा फेब्रुवारीचा ‘पल्स’ किंवा विविध डाळींचं महत्त्व सांगणारा दिवस. या डाळी ऋतुमानानुसार आवश्यक प्रमाणात आहारात याव्यात म्हणून कॅम्पेन सुरू करायला लागावी हे आश्चर्यच. एखाद्यावर एखादी गोष्ट जमली नाही तर ‘डाळ शिजली नाही’ असं उपरोधाने म्हटलं जातं किंवा काही गडबडीची गोष्ट असेल तर ‘दाल में काला’ असा हिंदी वाप्रचार येतो. यामागचे अर्थ हा भाषेचा विषय, पण मुळात ‘डाळ’ हे रोजच्या आहारातलं अविभाज्य खाद्यान्न असल्यानेच या म्हणी प्रचलित झाल्या. आरोग्याची ‘डाळ’ व्यवस्थित शिजायची तर जेवणातही डाळ हवी हाच ‘पल्सेस डे’ चा संदेश.