अमेरिकेच्या 231 वर्षांच्या इतिहासातील काळे पर्व, डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर दुसऱ्यांदा महाभियोग

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमेरिकेच्या 231 वर्षांच्या इतिहासात प्रथमच देशाच्या राष्ट्राध्यक्षांवर दोनदा महाभियोगाची सुनावणी मंगळवारी मध्यरात्रीपासून सुरू झाली. माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या समर्थकांना चिथावणी देत कॅपिटॉल हाऊसमध्ये हिंसाचार करायला प्रेरित केले, असा आरोप ठेवत त्यांच्यावर दुसऱ्यांदा ही सुनावणी घेतली जात आहे.

मात्र ट्रम्प यांच्या वकिलांनी ट्रम्प निर्दोष असून त्यांच्यावर चालवली जाणारे महाभियोग सुनावणी हे केवळ सूडनाटय़ असल्याचा दावा केला आहे. सत्ताधारी डेमोक्रॅटिक पक्षाने मात्र सिनेटमध्ये नवे बायडेन यांच्या निवडीवर शिक्कामोर्तब होत असताना ट्रम्प समर्थकांनी माजवलेला हिंसाचार हा राज्यघटनाविरोधी गंभीर गुन्हा असून त्याला ट्रम्प यांचे भडकाऊ आवाहनच कारण असल्याचे म्हटले आहे.

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी निवड झालेले नवे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या विजयावर अमेरिकन सिनेट शिक्कामोर्तब करीत असताना संतप्त ट्रम्प समर्थकांनी कॅपिटॉल हाऊसमध्ये घुसून हिंसाचार माजवला होता. 6  जानेवारीची ही घटना अमेरिकेच्या लोकशाहीवादी इतिहासातील काळे पर्व असल्याची भावना सत्ताधारी डेमोक्रॅटिक पक्षाने व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे महाभियोगाची ट्रायल चालवले जाणारे डोनाल्ड ट्रम्प हे देशाचे पहिले मावळते राष्ट्राध्यक्ष आहेत. त्यांना याआधी 2020 मध्ये राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत युक्रेनची मदत मागितल्याचा आरोपावरून पहिल्या महाभियोगाला सामोरे जावे लागले होते. कायदेतज्ञ आणि  विशेषज्ञांच्या मतानुसार ट्रम्प यांच्यावरील ही दुसरा महाभियोग चाचणी फार काळ चालणार नाही.

महाभियोग मंजुरीसाठी डेमोक्रॅटिक पार्टीला सिनेटमध्ये दोन तृतीयांश मतांची गरज भासणार आहे. सध्याच्या सिनेटमध्ये डेमोक्रॅटिक आणि रिपब्लिकन्स या दोन पक्षांचे बलाबल 50-50 असे आहे. त्यामुळे सत्ताधारी डेमोक्रॅटिक पक्षाला ट्रम्प यांच्यावर महाभियोग चालवण्याच्या मंजुरीसाठी विरोधी रिपब्लिकन्स पक्षाची किमान 17 मते मिळवावी लागतील.यापूर्वी अमेरिकन राष्ट्राध्यक्ष अँडय़ू जॉन्सन (1868), बिल क्लिंटन (1998) आणि रिचर्ड निक्सन (1974) यांच्याविरुद्ध विरोधकांनी महाभियोग प्रस्ताव आणला होता.