व्यावसायिकाची फसवणूक करणारा अटकेत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कापड व्यावसायिकाची फसवणूक करणाऱयाला बोरिवली पोलिसांनी अटक केली. हरीश वाधवा असे त्याचे नाव असून त्याच्या अटकेने पाच गुह्यांची उकल करण्यात बोरिवली पोलिसांना यश आले.

तक्रारदार हे कापड व्यावसायिक असून ते बोरिवली परिसरात राहतात. गेल्या वर्षी एक जण त्यांच्या दुकानात आला. त्याने आपण कापड व्यावसायिक असल्याच्या भूलथापा मारल्या. कपडयाचा माल खरेदी करून नोकराकडे पैसे पाठवून देतो असे सांगितले. त्यावर विश्वास ठेवून तक्रारदाराने नोकराला पाठवले.

काही वेळानंतर तो हरीशने नोकराला गाडीत बसवून ठेवून त्याने पळ काढला. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तक्रारदाराने बोरिवली पोलीस ठाणे गाठले. बोरिवली पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. वरिष्ठ निरीक्षक सुधीर कालेकर यांच्या मार्गदर्शनखाली उपनिरीक्षक नीलेश मोरे यांनी तपास सुरू केला.

तपासादरम्यान पोलिसांनी दुकानातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. हरीश हा दादर परिसरात येणार असल्याची माहिती मोरे यांना मिळाली. मोरे यांच्या पथकाने सापळा रचून हरीशला ताब्यात घेऊन अटक केली. हरीशविरोधात चेंबूर, ऍण्टॉप हिल, वडाळा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.