
‘झपाटलेला’ या प्रसिद्ध सिनेमात ‘बाबा चमत्कार’ ही अजरामर भूमिका साकारणारे ज्येष्ठ अभिनेते राघवेंद्र कडकोळ यांचे नुकतेच निधन झाले. कडकोळ यांनी ब्लॅक अँड व्हाईट चित्रपटापासून आपल्या कारकीर्दीला सुरुवात केली. रंगभूमीवर त्यांनी काशीनाथ घाणेकर, शरद तळवलकर यासारख्या दिग्गज कलावंतांसोबत काम केले. नववीत शिकत असताना त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचे लिखाण झपाटल्यासारखे वाचले. त्यामुळे सावरकरांच्या विचारांचा प्रभाव त्यांच्या मनावर होऊ लागला. याचदरम्यान त्यांनी आपले शिक्षण सोडून देशसेवा करण्याचा निर्णय घेतला. नौदलात भरती होण्यासाठी परीक्षा पास केल्या. हिंदुस्थानी आयएनएस विभागात एका टीमसोबत त्यांना पाठवण्यात आले. तेथील समुद्र, बोटी पाहून ते अगदी भारावून गेले. शेवटी आपण जे ठरवले ते प्रत्यक्षात उतरत असल्याचा आनंद त्यांना होत होता, परंतु त्या टीममधून राघवेंद्र यांना बाजूला काढून पुन्हा मेडिकल टेस्ट घेण्यासाठी पाठवण्यात आले. याअगोदर सगळ्या मेडिकल टेस्ट पास करूनच त्यांना तिथे पाठवण्यात आले असताना पुन्हा ही टेस्ट कशासाठी? असा प्रश्न त्यांच्या मनात घोळत बसला. रिपोर्टमध्ये त्यांच्या एका कानात दोष असल्याचे कारण सांगून त्यांना घरी पाठवण्यात आले होते. घरी परतल्यावर राघवेंद्र यांनी शिक्षणाकडे लक्ष पेंद्रित केले. महाविद्यालयात शिकत असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यामुळे घरातील आर्थिक जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आली. उदरनिर्वाहासाठी त्यांनी जंगल खात्यात टायपिस्ट म्हणून सरकारी नोकरी मिळवली. नोकरी करत असताना राघवेंद्र यांनी रंगभूमीवर पडद्यामागे कलाकारांना निरोप देणे, चहा देणे, खुर्च्या मांडणे अशी मिळेल ती कामे स्वीकारली, परंतु एक कलाकार म्हणून त्यांनी कधीच कोणासमोर काम मिळवण्याची मागणी केली नाही. ‘करायला गेलो एक’ हे पहिले व्यावसायिक नाटक त्यांनी साकारले. महिन्यातून वीस-बावीस दिवस नाटकांचे दौरे असल्याने नोकरीवर परिणाम होऊ लागला. त्यामुळे त्यांना नोकरीवर पाणी सोडावे लागले होते. जवळजवळ दोन दशकांपूर्वी रिलीज झालेल्या ‘झपाटलेला’ या सिनेमाचा उल्लेख निघाला की, सर्वप्रथम आठवतो तो तात्या विंचू आणि त्याला ‘ओम फट् स्वाहा’ हा मृत्युंजय मंत्र देणारा बाबा चमत्कार. लक्ष्मीकांत बेर्डे, महेश कोठारे आणि दिलीप प्रभावळकर यांच्यासह राघवेंद्र कडकोळ यांच्या महत्त्वाच्या भूमिका चित्रपटात होत्या. राघवेंद्र कडकोळ यांनी ‘बाबा चमत्कार’ ही व्यक्तिरेखा वठवली होती. ‘झपाटलेला’ या चित्रपटाच्या सिक्वेलमध्येही राघवेंद्र झळकले होते. ‘अश्रूंची झाली फुले’ नाटकातील ‘धर्माप्पा’ ही भूमिका राघवेंद्र यांच्याकडे ओघाने आली. एक कानडी व्यक्ती मराठी कशी बोलते याचे उत्तम उदाहरण म्हणजे धर्माप्पा. त्यांच्या या भूमिकेचे विशेष कौतुकदेखील झाले. धोंडी, देवदासी, हसूया पण कायद्याच्या कचाट्यात, रायगडाला जेव्हा जाग येते यांसारख्या चित्रपट, नाटकांत त्यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली. त्यांच्यातील कलागुणांमुळे बालगंधर्व जीवन पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले. काही वर्षांपूर्वी राघवेंद्र कडकोळ यांना अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषद, पुणे शाखेतर्फे ‘नटवर्य केशवराव दाते पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले होते. त्यांनी ‘गोल्ड मेडल’ नावाचे पुस्तक लिहिले आहे. बालगंधर्व परिवारातर्फे ज्येष्ठ नाटय़-चित्रपट अभिनेते राघवेंद्र कडकोळ यांना जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. कडकोळ यांनी ‘ब्लॅक अँड व्हाईट’, ‘पुठे शोधू मी तिला’, ‘गौरी’, ‘सखी’ या मराठी चित्रपटांमध्ये, तर ‘छोडो कल की बाते’ या हिंदी चित्रपटात काम केले. कडकोळ यांनी ‘गोल्ड मेडल’ नावाचे पुस्तकही लिहिले आहे. चित्रपट, नाटक क्षेत्रात त्यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली.
– मेधा पालकर





























































