
अनेकदा मानसिक आजारातून पूर्णपणे बरे झालेल्या व्यक्तींना रोजगार मिळवण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागतो. हे लक्षात घेऊन येरवडा येथील प्रादेशिक मनोरुग्णालयात महिलांना स्वयंरोजगारचे प्रशिक्षण दिले जाते. यामध्ये आता ब्युटीपार्लरच्या कोर्सची भर पडली आहे.
सध्या रुग्णालयाच्या महिला विभागात ब्युटी पार्लर सुरू झाले आहे. तिथे मनोरुग्णालयात उपचार घेऊन बऱया झालेल्या तीन महिलांना प्रशिक्षण दिले जात आहे. एका एनजीओच्या सहकार्याने हा उपक्रम सुरू असून महिलांच्या पुनवर्सनाच्यादृष्टीने खूप महत्त्वाचा आहे.
यशस्वी सामाजिक संस्था आणि सामाजिक कार्यकर्त्या सारिका मोरे यांच्या सहकार्याने येरवडा प्रादेशिक मनोरुग्णालयात महिलांसाठी ब्युटीपार्लर कोर्स सुरू झाला आहे. आतापर्यंत तीन जणींनी कोर्ससाठी नाव नोंदकले आहे. त्या मानसिक आजारातून बऱया झाल्या आहेत. आता त्या पूर्णपणे प्रशिक्षणाचा आनंद घेत आहेत, अशी माहिती रुग्णालयाच्या उपअधीक्षक डॉ. गीता कुलकर्णी यांनी दिली.
कोरोनामुळे येरवडा मनोरुग्णालयातील विविध उपक्रम सध्या ठप्प आहेत. रुग्णालयातील महिलांना शिवणकाम शिकवले जाते. तसेच कागदाच्या पिशव्या तयार करणे, स्टेशनरी वस्तूंचे प्रशिक्षण दिले जाते. सध्या हे उपक्रम बंद आहेत.
सध्या येरवडा मनोरुग्णालयात 496 महिला आहेत. अलिकडेच बापू ट्रस्टच्या मदतीने मनोरुग्णालयाने सात महिलांचे पुनर्वसन केले आहे.
हा एक पायलट प्रोजेक्ट आहे. सध्या तीन महिलांना ब्युटीपार्लरचा कोर्स शिकवला जात आहे. या महिला दोन वर्षांपासून इथे आहेत. – डॉ. अभिजीत फडणवीस, अधीक्षक
























































