मुद्दा – साहित्य संमेलनाची जन्मकथा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> योगेंद्र ठाकूर

मराठी समाजाला आपली भाषा, संस्कृती आणि इतिहास जपायला मनापासून आवडतो आणि त्याचा मराठी मनाला अभिमानदेखील आहे. आपण मोठय़ा प्रमाणात उत्सवी आहोत आणि उत्सवाला लागणारा उत्साहदेखील आपल्याकडे आहे. कारण ती आपली वृत्ती आहे. धर्मरूढीनुसार, निसर्ग नियमानुसार येणाऱया सण-उत्सवांबरोबरच तितक्याच उत्साहाने सामाजिक व सांस्कृतिक उत्सव मोठय़ा प्रमाणात साजरे करतो. त्यामध्ये साहित्य संमेलन हा एक उत्सव आहे. ही केवळ अलीकडची गोष्ट नाही, तर या संमेलनाला आता तब्बल 143 वर्षे झाली. त्यात 93 साहित्य संमेलने झाली तर पुढील मार्च महिन्यात नाशिक येथे भरणारे साहित्य संमेलन हे 94 वे साहित्य संमेलन आहे. 1878 सालापासून सुरू झालेले हे संमेलन आजही संपन्न होत आहे. इतक्या प्रदीर्घ काळ साहित्य संमेलनाचे आयोजन करणारे, सारस्वतांचा मेळा भरवणारे महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे.

1878 साली विद्येचं माहेरघर असणाऱया पुणे शहरात ‘पहिले ग्रंथकार संमेलन’ पार पडले. त्याची थोडक्यात हकीकत अशी की, मुंबई विद्यापीठात फेलो म्हणून कार्यरत असणारे, जज म्हणून निवृत्ती घेणारे आणि 40 वर्षांत 45 हून अधिक ग्रंथ लिहिणारे लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख आणि महाराष्ट्रातील प्रबोधन युगाचे अग्रणी व मराठी वाङ्मयप्रेमी समाजसुधारक महादेव गोविंद रानडे या दोघांच्या सह्या असलेले एक निवेदन 7 फेब्रुवारी 1878 च्या ‘ज्ञानप्रकाश’ या वृत्तपत्रात प्रकाशित झाले ते असे, ‘‘या देशात ग्रंथ प्रकाशनास आणि प्रचारास चालना मिळावी म्हणत पाच रुपये भरून ग्रंथ खरेदीची योजना दिली होती.’’ निवेदनात पुढे असेही म्हटले होते की, ‘‘अशा एक हजार इच्छुकांची लेखी संमत्ती मिळाल्यास ‘मराठी उत्तेजक मंडळी’ नावाची संस्था तयार करून तिचे कार्यालय, ग्रंथकार व परीक्षक कमिटय़ा करण्याचा मनोदय व्यक्त केला होता.’’ (संदर्भ – आठवणीतील साहित्य संमेलने – डॉ. श्रीकांत केंकरे).

‘ज्ञानप्रकाश’मधील निवेदनाची दखल मराठी ग्रंथप्रेमी, विचारवंत व समाजसुधारक यांनी घेऊन 11 मे 1878 रोजी पुण्यात जवळपास पन्नास ग्रंथकार जमा झाले. त्यांच्यासमोर न्यायमूर्ती महादेव रानडे यांनी संमेलनाचा प्रस्ताव मांडला. अध्यक्षस्थानी लोकहितवादी देशमुख असावे अशी तीव्र इच्छा न्यायमूर्ती रानडे यांनी व्यक्त केली, परंतु वयाने लहान एकही ग्रंथ प्रकाशित नसलेले न्यायमूर्ती समाजसुधारक महादेव गोविंद रानडे यांनी अध्यक्षस्थान भूषवावे असा आग्रह उपस्थितांनी आणि स्वतः लोकहितवादी देशमुखांनी धरला आणि न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे हे पहिल्या ग्रंथकार संमेलनाचे अध्यक्ष झाले. या ग्रंथकार संमेलनातही काही वादविवाद झाले, पण विकोपाला गेले नाहीत, तर एकोपा टिकवून ग्रंथ संमेलन पार पडले. आपल्या अध्यक्षीय भाषणात संमेलनाच्या हेतूसह अनेक विवेचन करून उपस्थितांच्या शंका-कुशकांना न्यायमूर्तींनी समर्पक उत्तरे दिली. ग्रंथकार संमेलनाचे अध्यक्ष झाल्यानंतर 1894 साली न्यायमूर्ती रानडे यांनी ‘एकनाथी भागवतातील वेचे’, 1895 मध्ये ‘भागवत धर्मावरील दोन उपदेश’ आणि 1900 मध्ये ‘राईज ऑफ द पॉवर’ हे ग्रंथ प्रकाशित केले. त्यांनी स्वतः ग्रंथ लेखन केले तसे पत्नीसही शिक्षित करून ग्रंथ लिहिण्यास प्रोत्साहित केले. बीजवर असणाऱया न्यायमूर्ती रानडे यांनी वयाच्या 25 व्या वर्षी विधवेशी लग्न न करता रमाबाईंशी लग्न केले. समाजसुधारक म्हणवणाऱया न्यायमूर्तींवर तेव्हा टीका झाली होती. रानडय़ांशी लग्न झाल्यानंतर अक्षराशी ओळख नसणाऱया रमाबाईंनी मराठी, इंग्रजी व संस्कृत भाषा चांगल्या प्रकारे अवगत केल्या आणि नंतर ‘आमच्या आयुष्यातील आठवणी’ हे आत्मचरित्रही लिहिले. हे सर्व न्यायमूतींमुळे घडले. ते ग्रंथकार संमेलनाचे अध्यक्ष झाले नसते तर कदाचित त्यांच्याकडून घडले नसते.

1878 साली अध्यक्ष झालेले न्यायमूर्ती रानडे हे तेव्हा ग्रंथकार नव्हते तर ग्रंथप्रेमी होते. 1947 पर्यंत साहित्य संमेलन हे फक्त साहित्यिकांचे संमेलन नव्हते तर साहित्यावर प्रेम करणाऱयांचे होते. साताऱयाच्या 1905 सालच्या संमेलनाचे अध्यक्ष दादासाहेब करंदीकर हे केवळ साहित्यिकांचे मित्र होते. 1928 साली ग्वाल्हेर येथे संपन्न झालेल्या संमेलनाच्या अध्यक्षपदी माधव श्रीहरी अणे हे एक मुत्सद्दी राजकारणी व संस्कृत पंडित होते. 1935 साली इंदूर येथे भरलेल्या साहित्य संमेलनाचे बाळासाहेब पंतप्रतिनिधी हे अध्यक्ष होते. ते कीर्तनकार, चित्रकार व नमस्कार व्यायामाचे पुरस्कर्ते होते. कोल्हापूर येथे 1932 साली झालेल्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड यांची निवड झाली होती. अशा काही साहित्यिक नसलेल्या, परंतु मराठी साहित्यावर प्रेम करणाऱया थोर व्यक्तींची साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. त्याचप्रमाणे 26 ते 28 मार्चदरम्यान नाशिक येथे भरणाऱया 94 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी थोर खगोल शास्त्रज्ञ, विज्ञानवादी साहित्यिक डॉ. जयंत नारळीकर यांची निवड झाली आहे, याचा आनंद सर्व मराठी साहित्यप्रेमींना झाला आहे.