
वसई-विरार महापालिका निवडणुकीच्या तोंडावरच शिवसेनेने बहुजन विकास आघाडीला जोरदार धक्का दिला. आमदार क्षितिज ठाकूर यांचे खंदे समर्थक आणि बहुजन विकास आघाडीचे नेते पंकज देशमुख यांनी मंगळवारी शिवसेनेत प्रवेश केला.
वसई-विरार भागातील बहुजन विकास आघाडीचे पंकज देशमुख जी यांनी आज शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. pic.twitter.com/4JcePHKc2s
— ShivSena – शिवसेना (@ShivSena) February 16, 2021
देशमुख यांच्याबरोबरच वसई पूर्वपट्टीतील ऍड. कल्याणी पाटील, आदिवासी एकता परिषदेचे दत्ता सांबरे, प्रकाश जाधव, वंदना जाधव तसेच जनआंदोलन समितीचे गॉडसन रॉड्रिक्स यांनीही शिवसेनेचा भगवा झेंडा हाती घेतला.
‘वर्षा’ निवासस्थानी झालेल्या या पक्षप्रवेश सोहळ्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंकज देशमुख यांच्यासह शिवसेना प्रवेशकर्त्यांच्या हातावर शिवबंधन बांधून त्यांचे स्वागत केले आणि येत्या महापालिका निवडणुकीत वसई-विरारवर शिवसेनेचा भगवा फडकलाच पाहिजे यासाठी एकदिलाने कामाला लागा असे आवाहन केले.
यावेळी शिवसेना नेते नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, पालघर जिल्हा संपर्कप्रमुख आमदार रवींद्र फाटक यांच्यासह खासदार राजेंद्र गावीत, माजी जिल्हाप्रमुख शिरीष चव्हाण, शिवसेना वसई तालुकाप्रमुख नीलेश तेंडोलकर, वसई तालुका अल्पसंख्यांक क्षेत्रप्रमुख सलिम खान, महिला आघाडी जिल्हा संघटक किरण चेंदकणकर आणि शिवसेना वसई तालुका कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते.

























































