ज्येष्ठ आणि विकलांग वारकरी भाविकांना दिलासा, श्री विठ्ठल दर्शनाचा मार्ग होणार सुखकर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

श्री विठुरायाचे मंदिर अतिरेक्यांच्या हिटलिस्टवर असल्याने, मंदिराकडे जाणारे सर्व प्रमुख रस्ते खाजगी वाहनांना बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे वयोवृद्ध भाविकांना प्रदक्षिणा मार्गावरून मंदिरापर्यत चालत जावे लागत होते.

ज्येष्ठ वारकरी व विकलांग भाविकांची ही गैरसोय लक्षात घेऊन अॅड माधवी निगडे व वेणू सोपान वेलफेअर फाऊंडेशनने हा मार्ग सुखकर करण्यासाठी ई-रिक्षाची सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. सुमारे 10 लाख रुपये किंमतीच्या दोन रिक्षा या दोन दानशूर भक्तांनी मंदिर समितीला देणगी स्वरुपात दिल्या आहेत. त्याचा लोकार्पण सोहळा येत्या रविवारी संपन्न होत आहे.

श्री विठ्ठल मंदिराचा प्रदक्षिणा मार्ग ते मंदिर हे अंतर साधारण 400 ते 500 मीटर आहे. या मार्गावरून सामान्य भाविकांची रिक्षा किंवा टांगा या वाहनांना प्रवेश दिला जात नसल्याने अपंग आणि वयोवृद्ध भाविकांना अनेक त्रासांना सामोरे जावे लागत होते.

ही गैरसोय लक्षात घेऊन ॲड माधवी निगडे वेलफेअर फाऊंडेशन व वेणू सोपान वेलफेअर फाऊंडेशनने मंदीर समितीला ई-रिक्षा देऊ केली आहे. चौफाळा आणि महाद्वार पोलीस चौकी या दोन ठिकाणाहून जाणाऱ्या भाविकांना या ई-रिक्षाचा मोफत लाभ घेता येणार आहे. बॅटरीवर चालणाऱ्या या रिक्षाची किंमत 5 लाख रुपये इतकी आहे. या रिक्षाची देखभाल दुरुस्ती हे दोन दानशूर भाविक कायम स्वरुपी करणार आहेत.

अॅड निगडे या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या सदस्या आहेत. वारकरी भाविकांची होणारी ही गैरसोय निदर्शनास आल्यानंतर त्यांनी स्वखर्चातून ई रिक्षा देण्याचा निर्णय घेतला.