
तीन वर्षापूर्वी ज्याला मारण्याचा प्रयत्न केला तोच आता आपला खून करेल अशी भिती वाटत असल्यामुळे बंदूक बाळगणार्या एका सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जेरबंद केले. अनिकेत राजेंद्र लांडे (वय 21, रा.मादगुडेवाडी, ता.भोर, जी पुणे) असे या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. त्याच्या विरोधात समर्थ पोलीस ठाण्यात आर्म एक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
गुन्हे शाखेच्या पोलिसांना भवानी पेठेतील एका बस स्टॉपजवळ एक व्यक्ती बंदूक घेऊन संशयास्पदरीत्या उभी असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली होती. त्यानंतर गुन्हे शाखेच्या एका पथकाने त्याठिकाणी छापा घालून संबंधित तरुणाला ताब्यात घेतले. त्याच्या अंगझडती पोलिसांना एक गावठी बनावटीचे पिस्तूल आणि तीन जिवंत काडतुसे सापडली. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक करून समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
तपासादरम्यान जवळ बंदूक बाळगण्याचा उद्देश काय असे पोलिसांनी आरोपीला विचारले असता, त्याने सांगितले की तीन वर्षांपूर्वी त्याने एकाचा खुनाचा प्रयत्न केला होता. त्याच्यापासून जिवाला भीती असल्यामुळेच पिस्तूल जवळ ठेवले होते अशी माहिती त्याने पोलिसांना दिली. आरोपी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्या विरोधात खुनाच्या प्रयत्नाचे दोन आणि मारामारी चा एक असे तीन गुन्हे दाखल आहेत. पोलीस उपनिरीक्षक संजय गायकवाड अधिक तपास करीत आहेत.































































