
‘नंबर वन’ टेनिसपटू नोवाक जोकोविचने आपल्या लौकिकास साजेसा खेळ करीत कारकीर्दीत नवव्यांदा ऑस्ट्रेलियन ओपन ग्रॅण्डस्लॅम टेनिस स्पर्धेचा किताब जिंकला. अंतिम लढतीत सर्बियाच्या या खेळाडूने रशियाच्या चतुर्थ मानांकित डॅनिल मेदवेदेवचा 7-5, 6-2, 6-0 असा सरळ सेटमध्ये पाडाव करून विजेतेपदावर आपले नाव कोरले.
मेदवेदेवने पहिल्या सेटमध्ये जोकोविचला कडवी लढत दिल्ली. मात्र पुढील दोन सेटमध्ये जोकोविजने वर्चस्व गाजवित जेतेपदाला गवसणी घातली. जोकोविचने याआधी 2008, 2011, 2012, 2013, 2015, 2016, 2019 व 2020 मध्ये ऑस्ट्रेलिया ओपनचा किताब जिंकलेला आहे. कारकीर्दीतील त्याचे हे 18वे ग्रॅण्डस्लॅम जेतेपद होय. यात 9 ऑस्ट्रेलिया ओपन, 5 विम्बल्डन, 3 यूएस ओपन व एका फ्रेंच ओपन जेतेपदाचा समावेश आहे. ऑस्ट्रेलिया ओपन स्पर्धा सर्वाधिक वेळा जिंकण्याचा विक्रम आधीच जोकोविचच्या नावावर आहे. दुसऱया क्रमांकावर असलेल्या रॉजर फेडरर व रॉय इमरसन यांनी 6-6 वेळा ही ग्रॅण्डस्लॅम स्पर्धा जिंकलेली आहे. जोकोविचने आतापर्यंत 17 ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेत सहभाग घेतलाय. यातील नऊ वेळा अंतिम फेरी गाठणाऱया या पठ्ठय़ाने जेतेपदाच्या लढतीत एकदाही हार पत्करली नाही हे विशेष. ऑस्ट्रेलिया ओपनमध्ये नोवाक जोकोविचने 83 सामने खेळले असून यात 75 विजय, तर केवळ 8 पराभव पत्करले आहेत.
फेडररचा विक्रम मोडणार
नोवाक जोकोविच सर्वाधिक आठवडे अव्वल स्थानावर राहण्याचा विक्रम मोडण्याच्या उंबरठय़ावर आहे. स्वित्झर्लंडचा टेनिसपटू रॉजर फेडररच्या नावावर सर्वाधिक 310 आठवडे अव्वल स्थानी राहण्याचा विक्रम आहे. सध्या जोकोविच 306 आठवडय़ांपासून ‘नंबर वन’च्या सिंहासनावर विराजमान आहे. एटीपी क्रमवारी फ्रिज करण्यात आलेली आहे. म्हणजे हरल्यावर किंवा जिंकल्यावर कोणत्याच क्रमवारीत बदल होणार नाही. त्यामुळे आता 8 मार्चला जोकोविच 311 आठवडे अव्वल स्थानावर राहण्याचा विक्रम करणार आहे. त्यामुळे फेडररचा विक्रम आपोआप मोडणार आहे.
























































