
वाई येथील रविवार पेठेतील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या गर्ल्स हायस्कूलची इमारत पाडल्याप्रकरणी ‘ब्राह्मो समाजा’चे अध्यक्ष मीनल राजेंद्र साबळे व राजेंद्र सर्जेराव साबळे या दोघांवर वाई पोलीस ठाण्यात दरोडय़ाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गर्ल्स हायस्कूलच्या मुख्याध्यापिका रेखा ठोंबरे यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.
वाईतील रविवार पेठ येथे असलेल्या स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या गर्ल्स हायस्कूलच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून मीनल साबळे (वय 45), राजेंद्र साबळे (वय 52, दोघे रा. सातारा) यांनी संगनमताने शाळेतील 10 संगणक, प्रिंटर, महत्त्वाची कागदपत्रे, शाळेचे रेकॉर्ड, फर्निचर अशा सुमारे एक लाख 10 हजार रुपयांच्या ऐवजाचे नुकसान केले. तसेच शिवीगाळ व दमदाटी केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
मुलींच्या शिक्षणासाठी संस्था कायदेशीर लढा देणार!
वाई येथील गर्ल्स हायस्कूल या मुलींच्या शाळा इमारतीची झालेली तोडफोड संस्थेने गंभीरपणे घेतली असून, मुलींच्या शिक्षणासाठी संस्था कायदेशीर लढा देणार असल्याचे स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष अभयकुमार साळुंखे यांनी गर्ल्स हायस्कूल इमारतीची पाहणी केल्यानंतर सांगितले. यावेळी संस्थेचे सहसचिव डॉ. राजेंद्र शेजवळ, मुख्याध्यापिका रेखा ठोंबरे, डॉ. नितीन कदम, गिरीश गायकवाड, राजकुमार बिरामणे, अशोकराव सरकाळे, उषा ढवण आदी उपस्थित होते.


























































