कणकवलीत बॉक्सवेल पासची गरज, विद्यार्थ्यांसह नागरिकांची होते गैरसोय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई-गोवा महामार्गावरील चौपदरीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आले असतानाही या चौपदरीकणांमुळे अनेक ठिकाणी गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. कणकवली तालुक्यातील कासार्डे तिठा येथील ओव्हर ब्रिजला पियाळी फोंडा मार्गावरती कासार्डे हायस्कूल समोर बॉक्सवेल पास नसल्याने कासार्डे माध्यमिक, उच्च माध्यमिक व वरिष्ठ महाविद्यालयात शिकणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांची तसेच   वाहनचालकांची व ग्रामस्थांची फारमोठी गैरसोय होत आहे.

त्यामुळे हजारो विद्यार्थ्यांना दररोज शाळेत येताना आणि शाळा सुटल्यानंतर जीव धोक्यात घालून वाहनांचा अडथळा पार करीत प्रवास करावा लागत आहे. या ब्रिजला हायस्कूल समोर बॉक्सवेल पास तयार करून विद्यार्थ्यांची ग्रामस्थांची होणारी गैरसोय त्वरित दुर करावी अशी लेखी मागणी  कासार्डेतील सामाजिक कार्यकर्ते व ग्रामस्थांचे प्रतिनिधी संजय पाताडे यांनी सिंधुदुर्गाचे जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांच्याकडे केली आहे.याबाबत दखल घेतली गेली नाही तर कासार्डे पंचक्रोशीतील जनतेला तीव्र आंदोलन करावे असा इशाराही त्यांनी आपल्या निवेदनात दिला आहे.

1200  विद्यार्थी करतात जीवघेणा प्रवास

कासार्डे माध्यमिक विद्यालयात सुमारे बाराशे विद्यार्थी इयत्ता पाचवी ते पदवी पर्यंत चे शिक्षण घेत आहेत त्यामुळे या ठिकाणी नेहमीच प्रचंड गर्दी असते त्यामुळे अपघाताची दाट शक्यता नाकारता येत नाही. प्रशासनाने या गंभीर बाबीकडे लक्ष देऊन या ठिकाणी बॉक्सवेल तयार करण्याची मागणीही कासार्डे पंचक्रोशीतील ग्रामस्थ व पालकांमधून  केली जात आहे. तत्पूर्वी कासार्डे माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य, मुख्याध्यापक यांनीही  विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी बॉक्सवेल तयार करुन गैरसोय दूर करण्याची लेखी मागणी ब्रीज होण्यापूर्वी   करण्यात आली होती. कंपनीच्या अधिकाऱ्यांकडे लक्ष वेधले होते, पण कोणत्याही प्रकारची याबाबत दखल घेतली गेली नाही त्यामुळे या ठिकाणी बॉक्स वेल पास झालेला नसल्याने  सध्या विद्यार्थ्यांना,  ग्रामस्थांना जीव मुठीत घालून प्रवास करावा लागत आहे.