महिलेने ऑनलाईन मागवला अॅपलचा फोन, आला ‘अॅपल फ्लेवर’चा ‘हा’ पदार्थ..

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ऑनलाईन खरेदी हा आता सगळ्यांच्या जगण्याचा एक हिस्सा झाला आहे. पण, त्यात अनेकदा फसवणूकही होते. अशीच फसवणूक अॅपलचा महागडा फोन मागवणाऱ्या एका महिलेसोबत झाली आहे.

हा प्रसंग चीनमधील एका महिलेसोबत घडला आहे. लिऊ नावाच्या या महिलेने जवळपास दीड हजार डॉलर्सचा अॅपलचा आयफोन 12 प्रो मॅक्स मागवला. ही डिलीव्हरी थेट न होता एका एजन्सीतर्फे झाली. त्यातही तिला तिच्या घराशेजारील पोस्टलॉकरमध्ये ठेवण्याचा पर्याय निवडावा लागला.

महिलेने पैसे दिले आणि तिला दोन दिवसांनी पार्सल डिलिव्हर झाल्याचं कळलं. महिलेने पार्सल उघडून पाहिलं तेव्हा तिला धक्काच बसला. कारण आत आयफोन नव्हताच.

त्या ऐवजी त्यात अॅपल म्हणजेच सफरचंदाच्या फ्लेवरचं योघर्ट ड्रिंक पाठवण्यात आलं होतं. आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच तिने ताबडतोब डिलिव्हरी करणाऱ्या कंपनीशी आणि थेट अॅपल कंपनीशी संपर्क साधला.

गंभीर म्हणजे, या दोन्ही ठिकाणी तिने ऑर्डर केलेला फोनच डिलीव्हर झाल्याची नोंद होती. मात्र, तिच्या दाव्यानुसार तिला अॅपल फ्लेवरचं ड्रिंक मिळालं होतं. या प्रकरणी तिने स्थानिक पोलीस विभागाकडे तक्रार नोंदवली असून दोन्ही कंपन्या तिला फोन मिळवून देण्यासाठी सहकार्य करत आहेत.