
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाचा तपास हा कोणत्याही दबावाखाली होऊ नये. या प्रकरणावरून कोणतेही राजकारण होता कामा नये, अशी अपेक्षा माजी मंत्री आणि भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी आज व्यक्त केली.
मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. पूजा चव्हाण प्रकरणात राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांनी राजीनामा दिला की त्यांच्या पक्षाने घेतला हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. मात्र त्यांच्यावरील आरोपांची निष्पक्षपातीपणे चौकशी करावी. त्यासाठी वेगळी यंत्रणा निर्माण करण्याची गरज असेल तर वेगळी यंत्रणा निर्माण करण्यात यावी. सध्या राजकीय नेत्यांची अनेक प्रकरणे बाहेर येत असल्याने यासाठी एक वेगळी यंत्रणा अशा प्रकरणाच्या तपासणीसाठी असावी का असेही वाटू लागले आहे, असेही पंकजा मुंडे म्हणाल्या.
धनंजय मुंडे राजीनामा मागणी
रेणू शर्मा, करुणा शर्मा यांनी केलेल्या गंभीर आरोपांच्या पार्श्वभूमीवर राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणीही यानिमित्ताने पंकजा मुंडे यांनी केली. आपल्या पक्षाचीही हीच मागणी असल्याचे त्या म्हणाल्या.






























































