राममंदिराच्या नावाखाली भाजपची टोलवसुली, नाना पटोले यांचा जोरदार हल्ला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अयोध्येच्या राममंदिरासाठी भाजपकडून देशभर निधी गोळा केला जात आहे. भाजपच्या या मोहिमेवर आमदार नाना पटोले यांनी गुरुवारी विधानसभेत जोरदार टीका केली. भगवान श्रीरामांच्या नावाने निधी गोळा करण्याचा ठेका भाजपला कोणी दिला, असा सवाल करतानाच राममंदिराच्या नावाखाली भाजपची टोलवसुली सुरू आहे, असा गंभीर आरोप पटोले यांनी केला.

भाजपचे सुधीर मुनगंटीवार यांनी प्रश्नोत्तराच्या तासानंतर कामकाजाचा मुद्दा उपस्थित करीत अध्यक्षपदाच्या निवडीची मागणी केली. अध्यक्षपदाच्या निवडणुकीची तारीख जाहीर करा अन्यथा राष्ट्रपती राजवट लागू करावी लागेल, अशी धमकी त्यांनी दिली. त्या धमकीचा समाचार पटोले यांनी घेतला. मुख्यमंत्र्यांनी मुनगंटीवार यांना नटसम्राटाची उपमा दिल्याची आठवण त्यांनी यावेळी करून देताच विरोधकांनी सभागृहात गोंधळ सुरू केला. त्यावेळी संतप्त नाना पटोले यांनी थेट राममंदिराच्या मुद्दय़ावरूनच केलेला सवाल जिव्हारी लागल्याने विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि पटोले यांच्यात जोरदार जुंपली.

भगवान श्रीरामाच्या नावाने पैसा जमा करण्याचा ठेका कुणी दिला?

विरोधकांकडून सतत येणाऱया व्यत्ययामुळे संतप्त झालेल्या नाना पटोले यांनी थेट राममंदिराच्या मुद्दय़ालाच हात घातला. ‘भगवान श्रीरामाच्या नावे मंदिरासाठी पैसे मागितले जात असून दिले नाही तर धमकावलं जात असल्याची तक्रार माझ्याकडे आली आहे. अशा कोणत्या चॅरिटी कायद्यांतर्गंत हे पैसे गोळा करण्यात येत आहेत? श्रीरामाच्या नावाने पैसा गोळा करण्याचा ठेका यांना पुणी दिला? रामाच्या नावाने पैसा गोळा करणारे हे कोण? प्रभू श्रीरामाने यांना पंत्राट दिलं आहे का? मग 30 वर्षांपूर्वी श्रीरामाने घेतलेला निधी कुठे गेला?’ असे एकापाठोपाठ सवाल विचारताच सभागृहात एकच गोंधळ सुरू झाला.

काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाचा पदभार ज्या ऑगस्ट क्रांती मैदानात घेतला तेथील स्तंभावर कमळाचं चिन्ह असून मी त्याला सॅल्यूट केलं असं नाना पटोले यांनी सांगितले. आता सकाळच्या पहिल्या कामासाठी दात घासण्यासाठी पंजाचा वापर होतो म्हणून तो कापून ठेवणार आहात का? अशी विचारणा त्यांनी केल्यानंतर विरोधकांनी गदारोळ घालण्यास सुरुवात केली.

फडणवीस म्हणतात, राममंदिरावर चर्चा लावा

पटोले यांच्या सवालांमुळे संतापलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी राममंदिरावर चर्चा सुरू आहे का? तसं असेल तर स्वतंत्र चर्चा लावा. ज्यांना खंडणी गोळा करण्याची सवय आहे त्यांना समर्पण कळणार नाही. असेल हिंमत तर चर्चा लावा. काही अडचण नाही, अशा शब्दांत संताप व्यक्त केला. यावेळी भाजप सदस्यांकडून ‘जय श्रीराम’च्या घोषणा देण्यात आल्या.