
पश्चिम बंगाल विधानसभा निकडणुकीसाठी तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांनी शुक्रवारी आपल्या पक्षाच्या 291 उमेदवारांच्या नावांची यादी जाहीर केली. याचवेळी त्यांनी मी भवानीपूर मतदारसंघ सोडत आहे. केवळ नंदिग्राम मतदारसंघातून निवडणूक लढवेन, अशी घोषणा केली. त्यांनी 100 नवीन चेहऱयांना निवडणूक लढवण्याची संधी दिली आहे.
शुक्रवार हा ममतादीदींचा ‘लकी डे’ मानला जातो. याच दिवशी त्यांनी पक्षाची उमेदवार यादी जाहीर केली. त्यांच्या पारंपारिक भवानीपूर मतदारसंघातून शोबनदेक चटोपाध्याय रिंगणात उतरणार आहेत. 291 उमेदवारांमध्ये 51 महिला आणि 42 मुस्लिम उमेदवार आहेत. ममतादीदींनी 3 जागा मित्रपक्षांना सोडल्या आहेत. जनतेला जे उमेदवार हवेत त्यांचीच विधानसभेचे उमेदवार म्हणून निवड केलीय. ज्या इच्छुकांना तिकीट मिळाले नाही त्यांना विधान परिषदेकर संधी दिली जाईल, असेही ममता बॅनर्जींनी या वेळी स्पष्ट केले.
10 आमदारांसह 3 खासदार फुटणार
निवडणूक जवळ येतेय तशी बंडखोरी उफाळण्याची चिन्हे आहेत. तृणमूल काँग्रेसला बंडखोरीचा जबर फटका बसण्याची शक्यता आहे. पक्षातील 10 आमदारांसह तीन खासदार फुटण्याच्या मार्गावर आहेत.
ममतादीदींनी शिवसेनेचे मानले विशेष आभार
ममता बॅनर्जींनी शिवसेनेचे विशेष आभार मानले. शिवसेनेने पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसला पाठिंबा जाहीर केला आहे. ममता बॅनर्जींनी देशातील विविध प्रादेशिक पक्षांचे आभार मानताना शिवसेनेचा विशेष उल्लेख केला. विधानसभा निवडणुकीसाठी आम्हाला पाठिंबा जाहीर केल्याबद्दल मी शिवसेना तसेच तेजस्वी यादव, अरविंद केजरीवाल, हेमंत सोरेन यांचे आभार मानते, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.



























































