‘स्थान’ माहात्म्य – ‘तुतारी’ एक्प्रेस

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> विवेक दिगंबर वैद्य

मराठी साहित्यात काव्यसृष्टीचे दालन समृद्ध करणारे कवी कृष्णाजी केशव दामले अर्थात केशवसुत यांचे हे जन्मस्थान. सन 1866 मध्ये जन्मलेल्या या प्रतिभाशाली कविश्रेष्ठामुळे पारंपरिक काव्याला आत्माविष्काराचे प्रत्ययकारी स्वरूप प्राप्त झाले. ‘एक तुतारी द्या मज आणून, फुंकीन मी ती स्व-प्राणाने’ अशी हाक देत वसुंधरेला ‘सुरलोक साम्य’ प्राप्त करवून देण्याचे स्वप्न पाहणारा हा क्रांतिकारक कवी मालगुंडच्या मातीत जन्मला व हे ‘स्थान’ शारदेच्या प्रांगणात ‘माहात्म्य’ प्राप्त करते झाले.

गणपतीपुळे व गणेशगुळे येथील श्रीगणेशस्थाने सश्रद्ध मनाला आध्यात्मिक आनंद देतात आणि गणेशगुळे मंदिरानजीकची पांडवकालीन विहीर पर्यटकांना प्राचीन पुरातत्त्व समृद्धीची ग्वाही देते. वरकरणी अरुंद व सरळसोट भासणारी, मात्र पायऱया-पायऱयांनी उतरत तळाशी खोलवर नेणारी आणि पांडवांनी काळ्या पाषाणात बांधून काढलेली ही विहीर आपल्याला आख्यायिकेचे बोट धरून महाभारत काळात नेते.

कोकण प्रांतच नव्हे तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱयातील अशा अनेक वास्तू पांडवांनी वनवास काळात व एका रात्रीत बांधून काढल्याच्या अनेक आख्यायिका तिथल्या स्थानिकांकडून ऐकावयास मिळतात. त्या शक्याशक्यतेच्या पलीकडे असल्या तरी येथील अनेक ठिकाणी ‘महाभारता’सारख्या आर्ष महाकाव्यातून आपल्यापर्यंत पोहोचलेल्या पांडव, द्रौपदीसारख्या व्यक्तिरेखा इथे येऊन नांदून गेल्याचा आनंद काही औरच असतो. वनवास आणि अज्ञातवासाच्या काळात पांडवांनी किती पायपीट केली असेल याचा अंदाज बांधताना मन थक्क होते.

मुंबई-गोवा महामार्गावर निवळी फाटय़ावरून जात गणपतीपुळे, पावस, कोतवडे, आडिवरे, मालगुंड, कोळिसरे, तिवरे बंदर, नांदिवडय़ाचा कऱहाटेश्वर आणि जयगड अशी अनेक ठिकाणे पाहता येतात. गणपतीपुळय़ाहून नजीकचे गाव म्हणजे मालगुंड. उत्तम निसर्ग आणि अमर्याद समुद्रकिनाऱयाचा शेजार लाभलेले हे नेत्रसुखद स्थान जागतिक नकाशावर झळकले ते आद्यकवी केशवसुत यांच्यामुळे.

मराठी साहित्यात काव्यसृष्टीचे दालन समृद्ध करणारे कवी कृष्णाजी केशव दामले अर्थात केशवसुत यांचे हे जन्मस्थान. सन 1866 मध्ये जन्मलेल्या या प्रतिभाशाली कविश्रेष्ठामुळे पारंपरिक काव्याला आत्माविष्काराचे प्रत्ययकारी स्वरूप प्राप्त झाले. ‘एक तुतारी द्या मज आणून, फुंकीन मी ती स्व-प्राणाने’ अशी हाक देत वसुंधरेला ‘सुरलोक साम्य’ प्राप्त करवून देण्याचे स्वप्न पाहणारा हा क्रांतिकारक कवी मालगुंडच्या मातीत जन्मला व हे ‘स्थान’ शारदेच्या प्रांगणात ‘माहात्म्य’ प्राप्त करते झाले. वयाच्या चाळिशीत फुलपाखरु, भृंग, सतारीचे बोल, हरपले श्रेय, आम्ही कोण?, संध्याकाळ, नवा शिपाई, तुतारी, झपूर्झा आदी वैशिष्टय़पूर्ण काव्य आणि ‘सुनीत’ नामक काव्य प्रकार रसिकांच्या ओटीत घालून मृत्यूला कवटाळणाऱया केशवसुतांचे स्मारक ‘मालगुंड’ येथे राहत्या घरी उभारण्यात आले. दामले कुटुंबाच्या या वास्तूतील स्मारकात कविश्रेष्ठांच्या अनेक प्रसिद्ध रचना दगडांवर कोरलेल्या पाहावयास मिळतात. त्यांच्या समकालीन मराठी दिग्गज सारस्वतांची रेखाचित्रे व माहितीने सज्ज असलेले दालन, सोबत केशवसुतांच्या वस्तू आणि त्या काळी वापरण्यात येणाऱया घरगुती वापराच्या वस्तूदेखील जतन केल्या आहेत. सारस्वतांचे ‘स्थान-माहात्म्य’ दर्शविणारे हे केशवसुत स्मारक ‘लोकार्पण’ करतेवेळी कवी कुसुमाग्रज यांनी ‘हे स्मारक मराठी काव्याचे तीर्थक्षेत्र असून मालगुंड ही कवितेची राजधानी आहे’ असे गौरवोद्गार काढले होते आणि बहुधा ही बाब लक्षात घेऊनच कोकण रेल्वेमार्गावर धावणाऱया ‘दादर-सावंतवाडी’ गाडीचे नामकरण ‘तुतारी एक्स्प्रेस’ असे करण्यात आले आहे.

मालगुंडचा निसर्गरम्य परिसर आणि अथांग दर्याकिनारा डाव्या हाताशी ठेवून पुढे गेल्यावर काही वेळातच जयगड किल्ला आणि बंदर दृष्टोत्पत्तीस येते. जयगडचा हा ऐतिहासिक सागरी दुर्ग विजापूरकरांनी बांधला असा कयास आहे. हा किल्ला हस्तगत करण्याचे प्रयत्न आदिलशहाने अनेकदा केले, परंतु त्यास यश आले नाही. तेव्हा पंधराव्या शतकाच्या अखेरीस संगमेश्वर नाईक यांनी जयगड किल्ल्याचा ताबा घेतला. सतराव्या शतकाच्या अखेरीस कान्होजी आंग्रेच्या अखत्यारीत असलेल्या या किल्ल्यावर सन 1818 मध्ये इंग्रजांनी ताबा मिळवला. जयगड किल्ल्याची उभारणी करतेवेळी तटाचे बांधकाम वारंवार ढासळत होते. असे घडू नये म्हणून नरबळी देण्यात यावा असा उपाय कुणीतरी सुचविला. सांप्रतकाळी सर्वांवर अंधश्रद्धेचा पगडा जोरकस होता म्हणून बांधकाम निर्विघ्न पार पडावे या हेतूने ‘जयबा’ हा तरुण पुढे सरसावला. त्याला दगडी तटबंदीमध्ये जिवंत चिणण्यात आले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यानंतर तटाचे बांधकाम न ढासळता व्यवस्थितरित्या पूर्ण झाले. जयबाच्या बलिदानाचे स्मरण ठेवणाऱया इथल्या भूमिपुत्रांनी किल्ल्यातील दीपमाळेपाशी त्याचे स्मारक उभारले, जे आजही जयबाच्या त्यागाची साक्ष देत तिथे उभे आहे. या किल्ल्याचे नावही त्याच्या नावावरूनच ‘जयगड’ ठेवण्यात आल्याचे सांगितले जाते. मुख्य दरवाजाची कमान मुसलमानी पद्धतीची उत्तम स्थितीत आहे. दोन्ही बाजूंना कमलशिल्पे आहेत. आत देवडी व तटबंदीनजीक खोल्या आहेत. ब्रिटिशकाळात बांधलेले विश्रामगृह, कौलारू गणेश मंदिर आहे. मुख्य किल्ल्यास 14 व पडकोटाला 10 बुरूज आहेत. बारा एकर परिसरातील विस्तीर्ण अशा जयगड किल्ल्यावरून अथांग समुद्र व जयगड बंदराचे विलोभनीय दृश्य दिसते. येथून सूर्यास्ताचे चित्तवेधक दर्शन घेता येते. नजीकच्या शास्त्र्ााr खाडीतील जयगड बंदर देशातील नैसर्गिक व सर्वाधिक सुरक्षित बंदर म्हणून ओळखले जाते.

जयगड किल्ल्याच्या पडकोटाकडील उतारावर जयगड गाव वसलेले आहे, तर विरुद्ध बाजूला नांदिवडे गाव आहे. येथील श्रीकऱहाटेश्वराचे शिलाहारकालीन देवालय 11व्या शतकातील आहे. कोकणी धाटणीच्या कौलारू छपरातील वास्तूत नांदणारा स्वयंभू श्रीकऱहाटेश्वर जागृत असल्याचे ग्रामस्थ सांगतात. पायऱया उतरून खाली गेल्यावर विस्तीर्ण समुद्राच्या काठावर एकांतस्थळी वसलेल्या श्रीकऱहाटेश्वराचा सुरम्य परिसर मन मोहवतो. समुद्रास लागून असलेल्या गोमुखातून झुळझुळ वाहणारे गोड, निर्मळ पाणी निसर्गाचे अद्भुत तत्त्व जागवते. नांदिवडे येथे वैद्य, जोग, दामले घराण्यांचे पूर्वापार वास्तव्य आहे. येथील जोगेश्वरी, भावकाई-चंडकाईचे प्राचीन मंदिर, जवळच असलेले दीपगृह आणि नव्याने उभारण्यात आलेले जय विनायक मंदिर नांदिवडय़ाच्या स्थानमाहात्म्यात मोलाची भर घालते. रत्नागिरीपासून 45 किमीच्या परिघात असलेली ही निसर्गरम्य आल्हाददायक ठिकाणे रत्नागिरी-खंडाळा एस.टी. परिवहन मार्गाने जोडलेली आहेत.

[email protected]