हिंगोलीत तलवारीच्या धाकावर दरोडा, लाखो रुपयांचे दागिने लूटले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंगोली शहरालगत सुराणा नगर भागामध्ये दरोडेखोरांनी राज्य राखीव दलाच्या जवानाचे घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. दरोडेखोरांने तलवारीच्या धाकावर सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम असा सुमारे 3 ते 4 लाख रुपयांचा ऐवज पळवला आहे. सकाळी रविवारी  पहाटे 2 ते 3 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे..

हिंगोली शहरालगतच नांदेड रोडवर खटकाळी बायपास नजीकच सुराणा नगर असुन या ठिकाणी हिंगोलीच्या राज्य राखीव दलामध्ये कार्यरत असलेले  आर. व्ही. त्रिमुखे या जवानाचे घर आहे. त्या ठिकाणी त्यांचे आई-वडील ,पत्नी, भाऊ राहतात. जवान आर.व्ही, त्रिमुखे हे मागील काही दिवसापासून कर्तव्यावर परजिल्ह्यात गेलेले आहेत.

रविवारी पहाटे 2 ते 3 वाजण्याच्या सुमारास 10 ते 12 दरोडेखोर या भागात आले. व या दरोडेखोरांनी त्रिमुखे यांच्या घरात प्रवेश करण्यापूर्वी परिसरात असलेल्या वीस ते पंचवीस घरांच्या बाहेरून कड्या लावल्या. त्यानंतर त्रिमुखे यांच्या घराच्या चॅनल गेटचे कुलूप तोडून मधला दरवाजा तोडुन घरात प्रवेश केला. दरवाजा तोडण्याचा आवाजामुळे घरातली मंडळी जागी झाली. मात्र एकाच वेळी सहा ते सात दरोडेखोरांनी तलवारी व धारदार शस्त्रे हातात घेऊन घरात प्रवेश केला. दरोडेखोरांनी जवान त्रिमुखे यांच्या भावाचे हात बांधले. त्यानंतर त्यांचे आई-वडील, पत्नी व भाऊ यांच्या गळ्यावर तलवारी ठेवून त्यांना धमकी दिली.

त्यानंतर महिलांच्या गळ्यावरील दागिने काढून घेतले. तसेच दरोडेखोरांनी घरातील दोन कपाट फोडून त्यातील सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम ताब्यात घेऊन जाताना सर्वांजवळील मोबाईल घेऊन त्या ठिकाणाहून धुम ठोकली .

अचानक झालेल्या या घटनेमुळे त्रिमुखे कुटुंबीय चांगलेच हादरून गेले. काही वेळानंतर त्यांनी शेजार्‍यांना आवाज दिला. त्यानंतर परिसरातील नागरिक घटनास्थळी एकत्र आले. अत्यंत भेदरलेल्या अवस्थेत असलेल्या त्रिमुखे कुटुंबीयांना शेजारी राहणाऱ्या नागरिकांना धीर दिला. कुटुंबीयांनी पोलिसांत धाव घेतली असून तक्रार दाखल केली आहे.

बहुतांश दरोडेखोर 22 ते 25 वर्षे वयोगटातील होते. जीन्स पॅन्ट व टी शर्ट घातलेले दरोडेखोरांनी तोंडाला रुमाल बांधले होते, त्यामुळे त्यांचे चेहरे स्पष्टपणे ओळखू आले नाही. या प्रकारामुळे हिंगोली शहरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे.