
शहरातील कायदा सुव्यवस्था सुरळित ठेवण्यासाठी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी लक्ष केंद्रीत केले असून गुन्हेगारांसह सराईत टोळ्याविरूद्ध कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. त्यानुसार आता गँगस्टर निलेश घायवळसह त्याच्या टोळीवर पुणे पोलिसांनी मोक्कानुसार (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायदा) कारवाई केली आहे. पोलिसांनी त्याला येरवडा कारागृहातून अटक केली आहे. पुणे ग्रामीण पोलिसांनी नुकतीच त्याच्यावर स्थानबद्धतेची कारवाई करून एक वर्षासाठी येरवडा कारागृहात रवानगी केली होती.
निलेश बन्सीलाल घायवळ (वय 44), संतोष आनंद धुमाळ (वय 38) व मुसाब उर्फ मुसा इलाही शेख (वय 29) अशी मोक्कात अटक केलेल्याचे नावे आहेत. कुणाल, कंधारे, अक्षय गोगावले, विपुल माझीरे व इतर 3 जणांवर अशी फरार झालेल्यांची नावे असून, त्यांचा शोध घेतला जात आहे. याप्रकरणी तरूणाने कोथरूड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
फिर्यादी तरूणाचा मोटार दुरुस्ती आणि खरेदी- विक्रीचा व्यवसाय असून कोथरूडमधील डावी भुसारी कॉलनीमध्ये त्यांचे गॅरेज आहे. गँगस्टर नीलेश घायवळचा हस्तक गुन्हेगार संतोष धुमाळच्या सांगण्यावरून भाउच्या रॅलीसाठी गाडी पाहिजे म्हणून आरोपींनी फिर्यादी तरूणाला चॉपरचा धाक दाखवून शिवीगाळ करून मोटार जबरदस्तीने नेली. त्यानुसार तरूणाने खंडणी विरोधी पथकात तक्रार केली होती. याप्रकरणी पथकाने टोळीचा हस्तक संतोष धुमाळ आणि मुसा याला अटक केली होती. खंडणी विरोधी पथकाकडून गुन्ह्याचा तपास सुरू असताना गँगस्टर निलेश घायवळचा यामध्ये सहभाग असल्याचे आढळून आले.
त्यानंतर खंडणी विरोधी पथकाने निलेश घायवळ याला येरवडा कारागृहातून ताब्यात घेउन अटक केली आहे. ही कामगिरी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहायक आयुक्त लक्ष्मण बोराटे, खंडणी विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे, पोलीस उपनिरीक्षक विजय झंझाड, श्रीकांत चव्हाण,जगन्नाथ भोसले, संपत अवचरे, राजाभाउ बोर्डे, महेश पवार, विजय गुरव, प्रदीप शितोळे, विनोद साळुंके, राहूल उत्तरकर, सचिन अहिवळे, शैलेश सुर्वे, सुरेंद्र जगदाळे, अमोल पिलाणे, संग्राम शिनगारे, मोहन येलपले, भूषण शेलार, प्रदीप गाडे, प्रवीण पडवळ, चेतन शिरोळकर, आशा कोळेकर यांच्या पथकाने केली. गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस आयुक्त डॉ. शिवाजी पवार करीत आहेत.





























































