मुंबईतील मेरिटाइम युनियनचे युरोपात संचलन, परदेशी जहाज मालकांसमोर हिंदुस्थानी दर्यावर्दीचे सादरीकरण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईतील मेरिटाईम युनियन ऑफ इंडियाने (एमयूआय) ग्रीस व नॉर्वे या युरोपीय देशांमध्ये जहाजांचे संचलन आयोजित केले आहे. परदेशी जहाज मालकांमध्ये हिंदुस्थानातील दर्यावर्दींना प्रमोट करण्याच्या दृष्टीने हे सादरीकरण होणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नुकत्याच अनावरण झालेल्या ‘मेरिटाइम इंडिया- 2030 डॉक्युमेंट’मध्ये सूचवल्याप्रमाणे हिंदुस्थानातील मर्चंट्स नेव्ही अधिकाऱयांची सर्वात जुनी संघटना मेरिटाइम युनियन ऑफ इंडियाने हा कार्यक्रम हाती घेतला आहे. यामुळे महाराष्ट्रातील, मर्चंट नेव्ही अधिकाऱयांना अधिकाधिक नोकऱया मिळणे अपेक्षित आहे. मर्चंट नेव्हीचे सुमारे 25 हजार अधिकारी मुंबई, पुणे यांसारख्या शहरांत वास्तव्यास आहेत, असा अंदाज आहे.

एमयूआयचे महासचिव अमरसिंह ठाकूर म्हणाले, मेरिटाइम इंडिया व्हिजन-2030 मध्ये दर्यावर्दींचा वाटा नजीकच्या काळात 20 टक्क्यांहून अधिक वाढविण्यासाठी आराखडा तयार केला आहे. यामुळे देशातील मेरिटाइम अर्थव्यवस्थेला नक्कीच पाठबळ मिळणार आहे. त्याचप्रमाणे या संचलनामुळे येत्या काही वर्षांत मर्चंट नेव्हीत रुजू होण्यासाठी देशातील तरुण मनुष्यबळ आकर्षित होतील.

चालू वर्षात युरोपमध्ये कोरोनाची साथ पूर्णपणे नियंत्रणात आली की, हिंदुस्थानच्या बंदर, जहाज बांधणी व जलवाहतूक मंत्रालयाशी तसेच मेरिटाइम असोसिएशन ऑफ शीपओनर्स, शिपमॅनेजर्स ऍण्ड एजंट्स (एमएएसएसए) या सर्वोच्च शिपिंग यंत्रणेशी सहयोग करण्याची आमची इच्छा आहे. दर्यावर्दींचे प्रमोशन ग्रीस व नॉर्वेतील जहाज मालकांमध्ये करण्याच्या हेतूने, संबंधित मंत्रालयाशी व यंत्रणांशी सहयोग करून ग्रीस व नॉर्वेच्या हिंदुस्थानी वकिलातींमध्ये प्रसिद्धी व मार्केटिंग कार्यक्रम आयोजित करण्याचा आमचा विचार असल्याचेही ठाकूर म्हणाले.

केंद्रीय बंदरे, जहाज बांधणी व जलवाहतूकमंत्री मनसुख मांडविया यांना एमयूआय व एमएएसएसए प्रतिनिधींच्या प्रस्तावित प्रतिनिधी मंडळाचे नेतृत्व करण्यासाठी एमयूआय निमंत्रण देणार आहे.