क्यार आणि महाचक्रीवादळग्रस्त मच्छीमार कुटुंबातील प्रत्येक नुकसानग्रस्ताला मिळणार पॅकेज

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘क्यार’ व ‘महा’चक्रीवादळग्रस्त मच्छीमार बांधवांना जाहीर करण्यात आलेले मदतीचे पॅकेज आता एकाच कुटुंबातील स्वतंत्र व्यवसाय करणाऱया सर्व पात्र सदस्यांना देण्यात येणार आहे. पूर्वी एका कुटुंबातील एकाच व्यक्तीला मदत मिळणार होती.

‘क्यार’ व ‘महा’ चक्रीवादळग्रस्त मच्छीमार बांधवांना दिलासा देण्यासाठी व ऑगस्ट ते ऑक्टोबर 2019 मध्ये वादळी हवामानामुळे मासेमारी करता न आल्यामुळे आर्थिक संकट निर्माण झाले आहे. या नुकसानग्रस्त मच्छीमार बांधवांसाठी राज्य सरकारने  65 कोटी 17 लाख 20 हजारांचे पॅकेज जाहीर केले होते. प्रत्येक कुटुंबातील एकाच व्यक्तीला या पॅकेजला फायदा देण्यात येणार होता. पण या पॅकेजमधील काही निकष, अटी व शर्तींमुळे मच्छीमारांना या पॅकेजचा फायदा  मिळण्यास अडचणी निर्माण होत होत्या. लोकप्रतिनिधी, मच्छीमार सहकारी संस्था, पारंपरिक मच्छीमार यांनी या निकषांमध्ये बदल करण्याची मागणी सातत्याने लावून धरली होती. त्यानुसार ही अट काढून टाकण्याचा निर्णय मत्स्यव्यवसायमंत्री अस्लम शेख यांनी घेतला.

त्याशिवाय मत्स्य पॅकेजचा फायदा मिळण्यासाठी राष्ट्रीयीकृत बँकेतच खाते असण्याची अटही  शिथिल करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत खाते असणाऱया पात्र लाभार्थ्यांनांही  मत्स्य पॅकेजचा लाभ मिळू शकेल.

  • राज्यात 13 हजार 838 यांत्रिकी मासेमारी नौका व 1 हजार 564 बिगर यांत्रिकी मासेमारी नौका अशा एकूण 15 हजार 402 मासेमारी परवानाधारक मासेमारी नौका आहेत. सिंधुदुर्ग जिह्यामध्ये 96 पारंपरिक पद्धतीने मासेमारी करणारे रापणकर संघ आहे.  आता निकषांमध्ये झालेल्या बदलांमुळे मत्स्य पॅकेजचा लाभ मिळण्याचा मार्ग सुलभ होणार आहे.