‘नगर अर्बन’च्या चिल्लर घोटाळ्याची झाडाझडती सुरू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
nagar-urban

भाजपचे माजी खासदार दिलीप गांधी यांच्या अधिपत्याखाली असलेल्या नगर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेचे अनेक घोटाळे उघड झाले आहेत. आज कोतवाली पोलिसांत दाखल असलेल्या तीन कोटींच्या चिल्लर गैरव्यवहार प्रकरणातील बँकेने सादर न केलेल्या इतर कागदपत्रांसाठी आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने थेट नगर अर्बन बँकेत छापा टाकला असून, कागदपत्रांची तपासणी सुरू केली आहे.

नगर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेमध्ये 22 कोटी रुपयांच्या गुह्यामध्ये अटक करण्यात आलेला आरोपी आशुतोष लांडगे याच्यावर कोतवाली पोलीस ठाण्यामध्ये तीन कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी बँकेच्या अधिकाऱयांनी गुन्हा दाखल केला आहे. हा गुन्हा तत्काळ दाखल न झाल्यामुळे त्यावेळी बँकेचे माजी संचालक राजेंद्र गांधी, पोपट लोढा, अनिल गट्टाणी यांनी बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱयांविरोधात ठिय्या आंदोलन केले होते.

लांडगे याने नगरमध्ये स्वतःचे धनादेश पास करून घेण्यासाठी बँकेमध्ये कोणतीही रक्कम न भरता तीन कोटी रुपयांची चिल्लर भरल्याचे भासविले होते. त्याने त्याच्या खात्यातले सर्व धनादेश हे वटवून घेतले. ही बाब अन्य लोकांच्या लक्षात आल्यानंतर बँकेच्या वर्तुळामध्ये एकच खळबळ उडाली. एक महिना उलटून गेला तरीही त्याची रक्कम कुठे दिसून आली नाही. लांडगे याने बँकेमध्ये चिल्लर भरल्याचे भासविले. मात्र, तसा कोणताही प्रकार झाला नाही. त्यावेळी मार्केट यार्ड शाखेचे व्यवस्थापक यांनी संबंधिताने कोणत्याही प्रकारची रक्कम भरली नसल्याचे लेखी पत्र बँकेला सादर केल्यामुळे बँकेच्या कारभाराचे धिंडवडे निघाले होते.

या प्रकारचा गुन्हा बँकेचे अधिकारी दाखल करायला तयार नव्हते. मात्र, बँकेच्या माजी पदाधिकाऱयांच्या रेटय़ामुळे शेवटी कोतवाली पोलीस ठाण्यामध्ये दाखल करण्यात आला असून, त्याच लांडगे याच्यावर सध्या पिंपरी-चिंचवड शाखेतील आर्थिक गैरव्यवहार प्रकरणाचा गुन्हा दाखल आहे. त्याला काल पिंपरी-चिंचवड पोलिसांनी अटक केली आहे.

लांडगे, वानखेडे यांना पोलीस कोठडी

n नगर अर्बन बँकेच्या पिंपरी-चिंचवड येथील शाखेतील 22 कोटींच्या फसवूणकप्रकरणी आणखी दोघांना अटक करण्यात आली आहे. जयदीप वानखेडे व आशुतोष लांडगे अशी त्यांची नावे आहेत. पिंपरी-चिंचवड स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दोघांनाही पुण्यातून सोमवारी दुपारनंतर अटक केली. यापूर्वी या प्रकरणात नवनीत सुरपुरिया व यज्ञेश चव्हाण यांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, लांडगे आणि वानखेडेला न्यायालयाने 15 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. बनावट मूल्यांकन सादर करून करण्यात आलेल्या या गुह्याची व्याप्ती आणखी वाढण्याची शक्यता आहे.

वेळोवेळी मागणी करूनही तपासासाठी कागदपत्रे दिली नाहीत

n कोतवाली पोलीस ठाण्यामध्ये तीन कोटी रुपयांचा दाखल झालेला गुन्हा नगरच्या आर्थिक गुन्हा अन्वेषण विभागाकडे वर्ग करण्यात आलेला होता. बँकेच्या अधिकाऱयांनी कागदपत्रे आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाला सादर केली नव्हती. वेळोवेळी सांगूनदेखील कागदपत्रे जमा न केल्याने आज नगरच्या आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलीस उपअधीक्षक प्रांजल सोनवणे यांच्यासह पथकाने आज सायंकाळच्या सुमारास अर्बन बँकेच्या मुख्य शाखेमध्ये येऊन कागदपत्रांची पडताळणी सुरू केली आहे. कशा पद्धतीने व्यवहार झाले, कशा पद्धतीने दाखवण्यात आले, त्या महिन्याचा आर्थिक व्यवहार कशा पद्धतीने बँकेने केला यांसह आशुतोष लांडगे याच्या नावावर असलेले पैसे व त्याचा खाते उतारा यासह विविध माहितीसुद्धा या पथकाने घेण्यास सुरुवात केली आहे. सायंकाळी उशिरापर्यंत पोलिसांकडून या प्रकरणी चौकशी सुरू होती.