मध्य रेल्वेच्या अठरा स्थानकांत डिजिटल मॅप; प्रवाशांना सोयीसुविधांची माहिती एकाच ठिकाणी मिळणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मध्य रेल्वेने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकांत प्रवाशांना सोयीसुविधांची माहिती देण्यासाठी डिजिटल मॅप असणाऱया एकूण पाच व्हिडीओ डिस्प्ले फलक उभे केले आहेत. सीएसएमटीच्या डॉ. डी. एन. रोडजवळील सबवेच्या प्रवेशद्वाराजवळ असा नवीन डिजिटल फलक उभा करण्यात आला आहे. अशा प्रकारचे डिस्प्ले फलक आता मध्य रेल्वेच्या एकूण अठरा विविध स्थानकांत प्रवाशांच्या सोयीकरिता उभारण्यात येणार आहेत.

नॉन फेअर रेव्हेन्यू उपक्रम

मध्य रेल्वेला हा डिजिटल फलक उभारण्यासाठी कोणताही खर्च आला नसून उलट कंपनीच रेल्वेला पैसे देणार आहे. पॅनोसॉनिक इंडिया या कंपनीशी यासंदर्भात पाच वर्षांचा करार करण्यात आला आहे. ‘नॉन फेअर रेव्हेन्यू’अंतर्गत मध्य रेल्वेने हा डिजिटल फलक बसविला असून त्याद्वारे जाहिरातीतून कंपनी उत्पन्न मिळविणार असून मध्य रेल्वेलाही महसूल मिळणार आहे.

या स्थानकांत उभा राहणार डिजिटल फलक

मध्य रेल्वेच्या मुंबई डिव्हिजनच्या 17 अन्य स्थानकांमध्येही अशा प्रकारच्या डिजिटल मॅप (व्हिडीओ वॉल) उभारण्यात येणार आहेत. या महत्त्वाच्या स्थानकांत  दादर, लोकमान्य टिळक टर्मिनस, ठाणे, कल्याण, पनवेल, मस्जिद, सँडहर्स्ट रोड, भायखळा, माटुंगा, शीव, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, मुलुंड, डोंबिवली, मानखुर्द अशा रेल्वे स्थानकांत प्रवाशांच्या सोयीसाठी डिजिटल वॉल उभारण्यात येणार आहेत.