पालिकेच्या ‘अतिक्रमण’ विभागातून चौहानांचे ‘निर्मूलन’ कधी होणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागात सहाय्यक अभियंता पदावर कार्यरत असणारे अरुणकुमार चौहान हे वेगवेगळ्या पदोन्नती मिळाल्यानंतरही गेली अनेक वर्षे अतिक्रमण विभागातच ठाण मांडून बसले आहेत. यातच चौहान यांच्याकडून मनमानी कारभार केला जात असल्यामुळे त्रस्त झालेल्या व्यावसायिक-दुकानदारांच्या वतीने अरुण साठे यांनी पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांच्याकडे तक्रार केली असून तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे.

सध्या सहाय्यक अभियंता पदावर कार्यरत असणाऱया अरुणकुमार चौहान यांच्या नियुक्त्यांबाबत तक्रारदार साठे यांनी माहिती अधिकारात मिळवलेली सविस्तर माहितीच आयुक्तांना तक्रारीत सादर केली आहे. यानुसार चौहान हे अतिक्रमण निर्मूलन खात्यामध्ये कनिष्ठ अभियंता म्हणून 1/10/2002 ते 6/8/2005 पर्यंत म्हणजेच साडेतीन वर्षे कार्यरत होते. यानंतर त्यांनी याच खात्यात पुन्हा बदली करून घेऊन दुय्यम अभियंता म्हणून 31/5/2016 ते 25/6/2019 असे तीन वर्षे काम केले. यानंतर त्यांनी पुन्हा याच खात्यात बदली करून घेऊन सहायक अभियंता म्हणून 26/6/2019 पासून काम करीत आहेत. चौहान यांनी 26/6/2019 रोजी अतिक्रमण निर्मूलन खात्यातून कार्यमुक्त न होता पदोन्नती मिळूनही पुन्हा त्याच खात्यात कार्यरत राहिले. हा सर्व प्रकार संशयास्पद असल्याचे तक्रारदार साठे यांनी तक्रारीत नमूद केले आहे.

गैरकारभाराचाही आरोप

अरुणकुमार चौहान यांच्याकडून मनमानीपणे आणि बेकायदेशीरपणे कारवाई सुरू असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून व्यावसायिक-दुकानदारांना मनःस्ताप सहन करावा लागत आहे. आपली वरपर्यंत ‘चलती’ आहे असे सांगून आपले कोणी वाकडे करू शकत नाही अशा धमक्याही चौहान यांच्याकडून दिल्या जातात. त्यामुळे पालिकेची बदनामी होत असल्यामुळे त्यांच्यावर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी साठे यांनी आयुक्तांकडे केली आहे.

नियम काय सांगतो

पालिकेच्या नियमानुसार कर्मचाऱयांना प्रशासनाच्या कामाची सर्वंकष माहिती होण्यासाठी दर तीन वर्षांनी 25 टक्के कर्मचाऱयांची बदली करण्यात येते. यानुसार कार्यवाही केली नसल्यास खातेप्रमुखांना जबाबदार धरून शिस्तभंगाची कारवाई होऊ शकते. बदली होऊनही कर्मचारी हजर झाला नाही तर वेतन, भत्ते काढता येत नाहीत.