‘रोझी स्टर्लिंग’ या परदेशी पक्ष्यांच्या आगमनाने मालवण परिसर गजबजला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

युरोप, मध्य आशिया, तुर्कस्तान भागातून हजारो किलोमीटरचे अंतर कापून कोकणात हजारोच्या संख्येने परदेशी पक्षी आले आहेत. सकाळी आणि सायंकाळी आकाशात उडणाऱ्या या पक्ष्यांचे थवे दिसून येत आहे. ‘रोझी स्टर्लिंग’ असे या पक्ष्याचे नाव असून मराठीत पळस मैना या नावाने ते ओळखले जातात. कोकणात पळस फुलायला लागतो त्या वेळेस हे पक्षी कोकणात येतात म्हणून यांना पळस मैना असे म्हणतात. मैनेसारखा दिसणारा हा गुलाबी पक्षी आहे.

मालवण रेवतळे भागात हे पक्षी विजेच्या तारांवर हजारोच्या संख्येने बसलेले असतात. बाजूलाच कांदळवन असल्याने त्या ठिकाणी रात्रीच्या मुक्कामाला असतात. कीटक, फळे, फुलांमधील मध हे या पक्ष्यांचे आवडते खाद्य आहे. पळसमैना पक्षी झुंडीने असतात. एका थव्यात 100 ते 1000 अशा संख्येत हे पक्षी असतात. अत्यंत सुंदर दिसणाऱ्या रोझी स्टर्लिंग पक्ष्याचे डोके व मान काळीभोर असते. गळा व पोट चमकदार गुलाबी असून पाठीवर पांढरी-गुलाबी झालर असते व डोक्‍यावर मध्यभागी आकर्षक तुरा, चोच तीक्ष्ण असून पंख काळे-तपकिरी, किंचित निळे-हिरवट असतात. नर व मादी सारखेच असून मादीचा तुरा थोडा आखूड असतो.

हे पक्षी पिकांवरील अळ्या व कीटकांचे भक्षण करत असल्याने यांच्या आगमन काळात कीटकांची संख्या कमी होते. त्यामुळेच यांना “नैसर्गिक कीटकनाशक’ म्हणतात तर यांच्या विष्ठेतून जमीन सुपीक होत असल्याने यांना “शेतकरी मित्र’ असेही म्हटले जाते. यांच्या विष्ठेतून मोठमोठे वृक्ष उगवतात. वनस्पतींची पुनर्निर्मिती होऊन परागकणांची देवाण-घेवाण होते. हे पक्षी फुलांतील मध खातात म्हणून दक्षिण हिंदुस्थानात यांना “मधुसारिका’ असे म्हटले जाते.

या पक्ष्यांचे समूह पश्‍चिमेतील देशातून व मध्य आशियातून रोमानिया, युक्रेन, कझाकिस्तान, तुर्किस्तान, ग्रीस, उजबेकिस्तान, इराण, अफगाणिस्तान, मंगोलिया, पाकिस्तान, चीन, नेपाळ मार्गे हजारो मैल अंतर कापून ते हिंदुस्थानात येतात. फुलझाडांकडे आकर्षित होणाऱ्या रोझी स्टर्लिंग हे पक्षी सध्या मालवणात स्थिरावले आहेत. रेडी रेवस या सागरी महामार्गालगत मालवण येथे असलेल्या विजेच्या तारांवर दररोज सकाळ, संध्याकाळी हजारो पक्षी असतात. आकाशात झेप घेऊन आकर्षक कलाकृती साकारत असतात. निसर्गप्रेमी व पक्षी निरीक्षकांसाठी ही मोठी पर्वणी ठरत आहे.