विजय हजारे चषक क्रिकेट, मुंबईचा विजेतेपदाचा चौकार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कर्णधार पृथ्वी शॉची स्पर्धेतील विक्रमी खेळी आणि अंतिम लढतीत त्याला मिळालेली नाबाद शतकवीर आदित्य तरे (107 चेंडूंत नाबाद 118 ) याच्या बळावर आज मुंबईने विजय हजारे चषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम लढतीत उत्तर प्रदेशवर 6 विकेटस्नी मात करीत आपला जेतेपदाचा चौकार नोंदवला. या स्पर्धेत सर्वाधिक धावांचा विक्रमही पृथ्वीने आपल्या नावावर केला आहे. पृथ्वीने यावेळी मयांक अगरवालला पिछाडीवर टाकत या स्पर्धेतील सर्वाधिक धावांचा विक्रम आपल्या नावावर केला आहे. पृथ्वीने 8 लढतींत 827 धावांची नोंद करण्याचा नवा विक्रम आपल्या नावावर केला आहे. स्पर्धेत पृथ्वीने 4 शतके झळकावली. त्यात 227 या त्याच्या सर्वोच्च धावसंख्येचा समावेश आहे.

लागोपाठ चार शतके झळकावून मुंबईला विजय हजारे चषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहचवणारा कर्णधार पृथ्वी शॉ आज क्षेत्ररक्षणावेळी जखमी झाला. त्यानंतरही संघासाठी 39 चेंडूंत 73 धावांची खेळी करीत पृथ्वी तंबूत परतला. पण सेनापती घायाळ झाल्यावरही यष्टिरक्षक आदित्य तरेने संघाचा किल्ला लढवत 107 चेंडूंत नाबाद 118 धावांची खेळी करीत संघाला जेतेपदाच्या लढतीत विजयी केले. पृथ्वी आणि आदित्य यांच्या दमदार खेळींच्या बळावर मुंबईने उत्तर प्रदेशचे 313 धावांचे मोठे आव्हान 41.3 षटकांतच केवळ 4 विकेट गमावून पार केले.

संक्षिप्त धावफलक
उत्तर प्रदेश ः 50 षटकांत 4 बाद 312 (माधव कौशिक नाबाद 158, समर्थ सिंग 55, आकाशदीप 55; तनुष कोटीयन 54 धावांत 2 विकेट ) पराभूत वि. मुंबई ः 41.3 षटकांत 4 बाद 315 (पृथ्वी शॉ 73, आदित्य तरे नाबाद 118, शम्स मुलानी 36, शिवम दुबे 42).

आदित्य तरेच्या झुंजार नाबाद शतकाने मुंबईचा विजय

सिंहगडच्या लढाईत सेनापती तानाजी मालुसरे पडल्यावर वयोवृद्ध शेलारमामाने जशी खिंड लढवली त्याच आवेशात कर्णधार पृथ्वी तंबूत परतल्यावर मुंबईचा यष्टिरक्षक फलंदाज आदित्य तरे झुंजला. आदित्यने 312 धावांच्या मोठय़ा आव्हानाचा दबाव झुगारत मोकळेपणाने फलंदाजी केली. त्याने नाबाद शतक झळकावताना शम्स मुलानी (36) आणि शिवम दुबे (42) यांच्या साथीने संघाची नौका विजयपथावर नेली. तरेने मुलानीसोबत तिसऱया विकेटसाठी 88 धावांची तर शिवम दुबेसोबत चौथ्या विकेटसाठी 88 धावांची खेळी करीत मुंबईचे नाव मर्यादित षटकांच्या विजय हजारे चषकावर कोरले. तरेच्या नाबाद शतकी खेळीत 18 सणसणीत चौकारांचा समावेश होता. तत्पूर्वी, दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर नाणेफेक जिंकणाऱया उत्तर प्रदेश संघाने सलामीवीर माधव कौशिक (156 चेंडूंत नाबाद 158), समर्थ सिंग (73 चेंडूंत 55) आणि आकाशदीप नाथ (40 चेंडूंत 55) यांच्या झुंजार खेळींच्या बळावर 50 षटकांत 4 बाद 312 अशी मोठी धावसंख्या उभारत मुंबईसमोर कडवे आव्हान उभे केले होते.