मराठा आरक्षण प्रकरण महाराष्ट्राची बाजू अधिक भक्कम होणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मराठा आरक्षणाबाबत राज्य शासनाची भूमिका स्पष्ट आहे. मंत्री अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली उपसमिती गठीत करण्यात आली आहे. सुप्रीम कोर्ट इतर राज्यांनी 50 टक्क्यांपेक्षा अधिक आरक्षण दिले, त्यांचे म्हणणे ऐकून घेणार आहे. यापुढे महाराष्ट्र राज्याची अधिक भक्कम बाजू होणार आहे. त्यामुळे रक्तपात, उद्रेक, हिंसेची भाषा करून मराठा आरक्षणाला वेगळे वळण लावण्याची गरज नसल्याचे मत गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले आहे.

राज्यमंत्री देसाई म्हणाले, सचिन वाझे प्रकरणाचा तपास महाराष्ट्र पोलिसांकडून योग्यरीतीने चालू होता. तपास योग्य दिशेने चालू असताना केंद्राने यामध्ये हस्तक्षेप करण्याची गरज नव्हती. गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई म्हणाले, या प्रकरणात पोलिसांचे नाव कुठेही मलीन झालेले नाही. जगभरात त्यांचे नाव असून, त्यांची तुलना स्कॉटलंट पोलिसांशी केली जाते. महाराष्ट्र पोलीस आपल्या पद्धतीने तपास करत असताना त्यांच्यावर अविश्वास दाखवून तपास इतरत्र देणे योग्य नाही.

कंगणा राणावतच्या ट्विटला किती महत्त्व द्यायचे हा सगळ्यांनीच विचार करण्यासारखा विषय आहे. महाराष्ट्राच्या न्यायव्यवस्थेवर ज्याचा विश्वास नाही, महाराष्ट्रात राहायचे, महाराष्ट्रातील लोकांच्या जीवावर मोठं व्हायचे आणि इथल्या पोलिसांवर, न्यायव्यवस्थेवर विश्वास नाही. माझ्यावरील खटले हिमाचल प्रदेशमध्ये चालवा, असे म्हणणाऱ्या कंगणा राणावतला महाराष्ट्र पोलिसांवर व सरकारवर बोलण्याचा नैतिक अधिकार नसल्याचे त्यांनी सांगितले.