
कोयत्याच्या धाकाने टेम्पो चालकाला लुटल्याप्रकरणी दोघा सराईतांना वारजे माळवाडी पोलिसांनी अटक केली. मंगेश विजय जडीतकर आणि गौरव पासलकर अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
याप्रकरणी विकास जानवळे यांनी वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार चौघांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शनिवारी रात्री अकराच्या सुमारास यश मित्र मंडळ चौकात घडली.
शनिवारी रात्री पावणेअकराच्या सुमारास फिर्यादी विकास टेम्पोतून आईसोबत घरी निघाला होता. यश मित्रमंडळ चौकात मंगेश, गौरव व त्याच्या इतर दोघा साथीदारांनी त्यांचा टेम्पो अडविला. त्यानंतर विकास यांना टेम्पोतून जबरदस्तीने खाली खेचून मानेला कोयता लावून खिशातील 3300 रुपयांची रोकड हिसकावून घेतली.
विकास यांच्या आईने आरोपींना पैसे दिले नाहीत म्हणून आरोपींनी दगड मारुन त्यांना दुखापत केली. हा सर्व प्रकार सुरू असताना काही नागरिक टेम्पो चालकाच्या मदतीसाठी धावले असता, त्यांनाही कोयत्याच्या धाकाने आरोपींनी पळवून लावले. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक आर. व्ही. शेवते तपास करीत आहेत.























































