हे सुंदर जग मला पाहता येणार! मोतीबिंदू ऑपरेशननंतर ‘बिग बीं’नी मानले डॉक्टरांचे आभार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गेल्या महिन्यात अमिताभ बच्चन यांच्या एका डोळ्यावर मोतीबिंदूची शस्रक्रिया झाली होती. स्वतः अमिताभ यांनी सोशल मीडियावरून ही माहिती दिली होती. तसेच शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याचे सांगितले होते. त्यानंतर रविवारी अमिताभ बच्चन यांनी ट्विट करत दुसऱया डोळ्यावरही मोतीबिंदूची शस्त्रक्रिया झाल्याची माहिती दिली. आयुष्य बदलणारा अनुभव असून हे सुंदर जग मला बघता येईल, असे म्हणत त्यांनी डॉक्टरांचे आभार मानले आहेत.

अमिताभ यांनी ट्विट करत म्हटलंय, ‘‘…आणि दुसरीदेखील सर्जरी चांगली पार पडली… बरा होतोय. आता सर्व ठीक आहे. वैद्यकीय तंत्रज्ञानातील चमत्कार आणि डॉक्टरांचे कौशल्य… आयुष्य बदलणारा अनुभव… तुम्ही आता ते पाहू शकता जे आधी दिसत नव्हतं… अर्थातच सुंदर जग!’’

याआधी शस्त्रक्रियेमुळे ब्लॉग लिहिताना अडचण येत असल्याचे बच्चन म्हणाले होते, पण आता दुसऱया शस्त्रक्रियेनंतर रंग, आकार नीट दिसत असल्याचे त्यांनी सांगितले आणि डॉ. हिमांशू मेहता यांचे आभार मानले. शस्त्रक्रियेला उशीर झाल्यास अंधत्व येऊ शकतं असे सांगत त्यांनी खूप उशीर होण्यापूर्वीच उपचार घेणं योग्य असल्याचा सल्ला दिला होता. बच्चन यांनी ब्लॉगच्या माध्यमातून चाहत्यांचे आणि हितचिंतकांचेही आभार मानले आहेत.