
देशाची आर्थिक नाडी गणल्या जाणाऱया राष्ट्रीयीकृत बँकांचे खासगीकरण करण्याच्या मोदी सरकारच्या निर्णयाला विरोध दर्शविण्यासाठी देशातील 10 लाख बँक कर्मचाऱयांनी आजपासून दोन दिवसांचा संप पुकारला आहे. आज संपाच्या पहिल्याच दिवशी देशातील आर्थिक व्यवहारांवर विपरित परिणाम होऊन ते मंदावल्याचे दिसत होते. बँकांच्या ‘काम बंद’ आंदोलनामुळे देशाची आर्थिक राजधानी मुंबईतील सामान्य नागरिकांच्या आर्थिक व्यवहारांना मोठा फटका बसला. या संपाची झळ मुंबई शेअर बाजारासह मुद्रा बाजारालाही बसली आहे. बँकांच्या या संपामुळे निर्माण झालेल्या संकटात खासगी बँका आणि एटीएम, ऑनलाइन व्यवहार हाच ग्राहकांना मोठा आधार ठरला आहे.
बँक संपाचे देशक्यापी परिणाम
- बँकांतील चेक क्लीअरन्स आणि सरकारी आर्थिक व्यवहार ठप्प
- शेअर बाजार आणि मुद्रा बाजाराचे व्यवहारही मंदावले z मुंबईतील राष्ट्रीयीकृत बँकांचे 40 हजार कर्मचारी, अधिकारी संपावर
- एटीएम, मोबाईल बँकिंग सेवा सुरू असल्याने ग्राहकांना काहीसा दिलासा
- खासगी बँका सुरू असल्याने देशातील आर्थिक व्यवहार अंशतः सुरू.
संपात कोण सहभागी
या संपात ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशन, ऑल इंडिया बँक ऑफिसर्स कॉन्फेडरेशन, नॅशनल कॉन्फेडरेशन ऑफ बँक एम्प्लॉईज, ऑल इंडिया बँक ऑफिसर्स असोसिएशन, बँक एम्प्लॉईज कॉन्फेडरेशन ऑफ इंडिया, इंडियन नॅशनल बँक एम्प्लॉईज फेडरेशन, इंडियन नॅशनल बँक ऑफिसर्स काँग्रेस, नॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ बँक वर्कर्स आणि नॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ बँक ऑफिसर्स या देशातील संघटनांनी सहभाग घेतला आहे.


























































