
मुंबईतील शाळांच्या कार्यालयीन कार्यात सुसूत्रता आणण्यासाठी शाळेत राबविण्यात येणारे विविध उपक्रम तसेच शाळांतील विद्यार्थी, शिक्षक, इमारती यांची माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी शिक्षण विभाग सॉफ्टवेअरचा वापर करणार आहे. पालिकेच्या प्राथमिक आणि माध्यमिक अशा एकूण 1,150 शाळांना याचा उपयोग होणार आहे.
मुंबईतील शाळांच्या कार्यालयीन कार्यात सुसूत्रता आणण्यासाठी पालिकेचा शिक्षण विभाग माहिती व्यवस्थापन प्रणालीचा (सॉफ्टवेअर) वापर करणार आहे. ही प्रणाली मराठी आणि इंग्रजीतून बनवण्यात येणार असून त्याची जोडणी आणि त्याच्या वापराचे प्रशिक्षण कंत्राटदाराने शाळांमधील मुख्याध्यापक कार्यालयांना देणे बंधनकारक आहे. सॉफ्टवेअर बनवल्यानंतर हे सॉफ्टवेअर मुख्याध्यापक वापरणार असून त्याच्या सुधारणेबाबत आवश्यक त्या सूचना देण्यात येणार आहे.
…तर कंत्राटदाराला दंड
माहिती व्यवस्थापन प्रणालीसाठी सॉफ्टवेअर विकसित करताना प्रत्येक सॉफ्टवेअर विकसित करण्याचे काम वेळेत पूर्ण न केल्यास प्रत्येक आठवडय़ाकरिता पूर्ण कंत्राट रकमेच्या एक टक्का याप्रमाणे सहा महिन्यांपर्यंत 10 टक्के दंड वसूल करण्यात येणार आहे.
अशा प्रकारे 9 महिन्यांपर्यंत, 9 महिन्यांपेक्षा जास्त दिवस झाल्यास दंड केला जाणार आहे. त्याचबरोबर सहा महिन्यांपर्यंत सॉफ्टवेअरमधील कोणतीही साधने बदलल्यास 25 हजारांचा दंड करण्यात येणार आहे. कंत्राटदाराने सुरक्षा लेखा अहवाल (सिक्युरिटी ऑडिट) सादर न केल्यास 10 टक्के दंड केला जाणार आहे.

























































