
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दारू जप्तीच्या दोन कारवाया केल्या. एका बेवारस टेम्पोतून पोलिसांनी दारुचे 139 बॉक्स जप्त केले. या टेम्पोच्या चालक व मालकाचा पोलीस शोध घेत आहेत. दर आणखी एका कारवाईत पोलिसांनी एका चारचाकी वाहनातून कारवाईत दारूसाठा आणि दोन वाहने असा सुमारे 33 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यात एका गाडीच्या चालकाला अटक करण्यात यश आले. तर, दुसरा चालक फरार आहे. विनोद आडे राहणार वर्धा असे अटकेतील एका चालकाचे नाव आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या नेतृत्त्वात पोलीस सहाय्यक निरीक्षक संदीप कापडे यांच्या पथकाने केली.
चंद्रपूर जिल्ह्यात दुसऱ्या जिल्ह्यातून दारू तस्करी होत असल्याच्या तक्रारी स्थानिक गुन्हे शाखे कडे प्राप्त झाल्या होत्या. त्यानंतर खाडे यांनी दारू तस्करीवर आळा घालण्यासाठी विशेष पथक गठित केलं. शहर पोलीस ठाणे हद्दीतील छोटा बाजार चौकातील एका गल्लीत बेवारस स्थितीत असलेल्या वाहनात दारूसाठा असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने छापा टाकून वाहनाची तपासणी केली. त्यात 115 पेट्या देशी दारू, 24 पेट्या विदेशी दारू आढळून आली. पोलिसांनी वाहन आणि दारूसाठा जप्त केला. चालक, मालकाचा शोध सुरू असून, शहर पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलं. तर, दुसरी कारवाई रामनगर पोलिस ठाणे हद्दीतील जनता कॉलेज चौक परिसरात करण्यात आली. चारचाकी वाहनाने दारूची तस्करी होत असल्याच्या माहितीवरून पोलिसांनी पाठलाग करून वाहन पकडले. वाहनाची चौकशी केली असता त्यात विदेशी दारूच्या 44 पेट्या आढळून आल्या. यावेळी वाहन चालक विनोद आडे याला अटक करण्यात आली. त्याच्याविरुद्ध रामनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक संदीप कापडे यांच्या पथकाने केली.




























































