तबलिगींमुळे एमबीबीएसचे पाठय़पुस्तक रद्द, दिल्लीतील मेळाव्यामुळे कोरोना वाढल्याचा पुस्तकात उल्लेख

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशात कोरोनाचा प्रादुर्भाव असतानाही नियमावलीचा भंग करत तबलिगी जमातच्या मुस्लिमांचा नवी दिल्लीत मेळावा झाला होता. त्या मेळाव्यामुळे कोरोना वाढला असा उल्लेख एमबीबीएसच्या पाठय़पुस्तकात केला गेल्याने वाद निर्माण झाला होता. परिणामी महाराष्ट्रात ते पाठय़पुस्तकच रद्द करण्यात आले आहे.

‘एसेन्सियल ऑफ मेडिकल मायक्रोबायोलॉजी’ असे या पुस्तकाचे शीर्षक आहे. पुस्तकाच्या तिसऱया आवृत्तीमध्ये तबलिगींच्या मेळाव्याचा उल्लेख आहे. तबलिगींच्या वादग्रस्त उल्लेखामुळे दि स्टुडंट्स इस्लामिक ऑर्गनायझेशनने त्यावर आक्षेप घेतला होता. तबलिगी जमातच्या मेळाव्यामुळे कोरोना वाढल्याचे शास्त्रीयदृष्टय़ा सिद्ध झालेले नाही असे या संघटनेचे म्हणणे होते.

पुस्तकातील तबलिगींच्या उल्लेखामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर आम्ही दिलगिरी व्यक्त करतो अशा शब्दांत पुस्तकाचे लेखक डॉ. अपुर्बा सास्त्री आणि डॉ. संध्या भट यांनीही माफी मागितली आहे. नव्या आवृत्तीमध्ये त्यात सुधारणा करण्यात येतील असे आश्वासनही त्यांनी दिले आहे.

गेल्या वर्षीच्या मार्चमध्ये नवी दिल्लीतील निझामुद्दीन मरकज येथे तबलिगींचा हा मेळावा झाला होता. त्यात सहभागी झालेल्या अनेकांना कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे मेळाव्यातील सहभागींचा शोध घेण्यास देशात मोहीमही हाती घेण्यात आली होती. त्याचप्रमाणे आयोजकांवरही कायदेशीर कारवाई करण्यात आली होती. परंतु नंतर न्यायालयाने त्यांच्याविरोधातील आरोप रद्दबातल ठरवले होते.