
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मच्छीमारांच्या विकासासाठी जिल्हा वार्षिक योजना लहान मासेमारी बंदर विकास अंतर्गत सुमारे 4 कोटी रुपयांचा निधी शिवसेनेच्या माध्यमातून मंजूर झाला आहे. आमदार वैभव नाईक यांनी मच्छीमारांना दिलेल्या वचनाची पूर्तता केली आहे.
शिवसेना तालुकाप्रमुख तथा जिल्हापरिषद सदस्य हरी खोबरेकर यांनी मालवण शिवसेना कार्यालय येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली. यावेळी यावेळी उपतालुकाप्रमुख गणेश कुडाळकर, शहरप्रमुख बाबी जोगी, किरण वाळके, उमेश मांजरेकर यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
या योजनेंतर्गत मालवणसाठी अडीच कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याचे खोबरेकर यांनी स्पष्ट केले. बंदरांच्या विकासासाठी विविध कामांची मागणी मच्छीमारांकडून करण्यात आली होती. त्यानुसार आमदार नाईक यांनी केलेल्या पाठपुराव्यानुसार पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत यांनी तरतूद करून घेतली. त्यानुसार जिल्ह्याला 4 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. मालवण तालुक्यासाठी 2 कोटी 50 लाख, देवगड तालुक्यासाठी 1 कोटी 30 लाख, वेंगुर्ले तालुक्यासाठी 68 लाख रुपये मंजूर झाले आहेत.
मालवण-कुडाळ तालुक्यातील चेंदवण, सर्जेकोट पिरावाडी, आचरा पिरावाडी, वायरी भूतनाथ, देवबाग, मोबारवाडी, कवठी गोडसे साना येथील कामांचा समावेश आहे. यात पर्यटन जेटी, मत्स्यजेटी, मासळी सुकविणे ओटा, रॅम्प, जोडरस्ता, मत्स्यखरेदी लिलावगृह अशा कामांचा समावेश आहे. ही कामे मंजूर केल्याबद्दल आमदार नाईक, खासदार विनायक राऊत, पालकमंत्री उदय सामंत यांचे खोबरेकर यांनी आभार मानले.






























































