खरा शल्यचिकित्सक!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> ऍड. प्रतीक राजूरकर

डॉ. इग्नाज यांचे संशोधन सदैव मानवजातीच्या आरोग्याला संजीवनी देणारे आहे. गेल्या वर्षी जागतिक स्तरावर कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्यावर ‘गुगल’ने डॉ. इग्नाज यांचे छायाचित्र ठेवून त्यांना मानवंदना दिली होती. आज जगभरात पुन्हा एकदा कोरोना विषाणूच्या वाढत्या संक्रमण काळात डॉ. इग्नाज यांच्या 47 वर्षांच्या खडतर, परंतु प्रभावी आयुष्याचे स्मरण गरजेचे ठरते.

सुधारणा मग ती कुठल्याही क्षेत्रातील असो; सामाजिक, सांस्कृतिक अथवा शास्त्रीय इत्यादी. सुधारकांना नेहमीच तत्कालीन व्यवस्थेच्या टीकेचे धनी व्हावे लागल्याचा इतिहास आहे. वैद्यकीय क्षेत्रातील अनेक विद्वानांनी त्या काळी प्रसूतीतज्ञ असलेल्या इग्नाज सेमलवाईस यांचे मूल्यवान संशोधन नाकारून त्यांना खोटे ठरवण्याचा प्रयत्न केला गेला. कालांतराने केवळ वैद्यकीयच नव्हे तर जगाला त्यांच्या संशोधनाची दखल घ्यावी लागली. डॉ. इग्नाज यांचे संशोधन सदैव मानवजातीच्या आरोग्याला संजीवनी देणारे आहे. गेल्या वर्षी जागतिक स्तरावर कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्यावर ‘गुगल’ने डॉ. इग्नाज यांचे छायाचित्र ठेवून त्यांना मानवंदना दिली होती. आज जगभरात पुन्हा एकदा कोरोना विषाणूच्या वाढत्या संक्रमण काळात डॉ. इग्नाज यांच्या 47 वर्षांच्या खडतर, परंतु प्रभावी आयुष्याचे स्मरण गरजेचे ठरते.

इग्नाज सेमलवाईस यांचा जन्म बुडापेस्ट येथे 1 जुलै 1818 साली एका सधन कुटुंबात झाला. खरे तर इग्नाज यांचे शालेय शिक्षण झाल्यावर त्यांनी विएन्ना विद्यापीठात विधी अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला होता. इग्नाज यांच्या हातून इतिहास घडायचा होता म्हणूनच कदाचित 1838 साली त्यांचा अभ्यासक्रम बदलला असावा. वकील होणाऱया इग्नाज यांनी वैद्यकीय अभ्यासक्रमात प्रवेश घेतला व 1844 साली वैद्यकीय शिक्षणात ते पदवीधर झाले. पुढे डॉ. इग्नाज यांनी प्रसूतीशास्त्राचे विशेष शिक्षण घेतले. इथूनच त्यांच्या आयुष्याला कलाटणी प्राप्त झाली.

डॉ. इग्नाज सहाय्य वैद्यकीय अधिकारी पदावर व्हिएन्ना येथील प्रसूतिगृहात रुजू झाले. त्या काळी युरोपातील प्रत्येक देशात बाळंतपणानंतर होणाऱया संसर्गजन्य ज्वराने थैमान घातले होते. बहुतेक महिलांची प्रसूती त्या काळी सुईणींच्या मदतीने घरातच व्हायची. परंतु अपवादात्मक परिस्थितीत अनेकदा महिलांना प्रसूतिगृहात भरती केले जायचे. प्रसूतिगृहात दाखल झालेल्या सरासरी 25-30 टक्के महिला बाळंतपणानंतरच्या संसर्गजन्य ज्वरास बळी पडत होत्या. डॉ. इग्नाज यांनी रोगाच्या मुळापर्यंत जाण्याचा निश्चय केला व आपले संशोधन सुरू केले. डॉ. इग्नाज वगळता इतर वैद्यकीय अधिकारी बाळंतपणानंतरच्या मातांचे मृत्यू रोखता येऊ शकतात याबाबत सांशक होते. डॉ. इग्नाज यांच्या संशोधनास म्हणूनच त्यांच्या वरिष्ठांचासुध्दा विरोध होता. प्रसूतिगृहात दोन विभाग होते. एका विभागात वैद्यकीय विद्यार्थी तर दुसरा विभाग सुईणींच्या ताब्यात होत्या. डॉ. इग्नाज यांच्या संशोधनातून धक्कादायक बाब समोर आली. वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या ताब्यातील विभागात बाळंतिणींचा मृत्यूदर अधिक होता, तर सुईणींची उपस्थिती असलेल्या विभागातील माता स्वस्थ होत्या.

पहिल्या विभागात बाळंतिणींचा होणारा मृत्यू चर्चेचा विषय ठरला. गर्भवती महिला सुईणींच्या दुसऱया विभागात प्रसूतीसाठी याचना करत असत. दुसऱया विभागात जागा नसल्यास गर्भवती महिलांनी रस्त्यावर प्रसूती होण्यास प्राधान्य दिल्याची नोंद आहे. परंतु रस्त्यात झालेल्या प्रसूतीनंतर बाळंतिणींना बाळंतपणानंतरच्या संसर्गाची कुठलीच लक्षणे दिसत नव्हती. डॉ. इग्नाज यांच्यासाठी ही बाब एक कोडे होऊन बसली. अखेर हे कोडे सुटले ते 1847 साली डॉ. इग्नाज यांच्या मित्राच्या मृत्यूने. शवविच्छेदन करताना मृतदेहातील विषाणूने डॉ. इग्नाजचे मित्र डॉ. जेकोब यांचा मृत्यू झाला होता. त्यांच्या शवविच्छेदनातून बाळंतिणींना होणाऱया संसर्गजन्य विषाणूत साम्यता आढळून आली. डॉ. इग्नाज यांना हा सर्व प्रकार लक्षात आला. शवविच्छेदन झाल्यावर हात न धुता विद्यार्थी व डॉक्टर बाळंतिणींच्या विभागात आल्याने संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव होऊन बाळंतिणींच्या मृत्यूला कारणीभूत ठरत होता. डॉ. इग्नाज यांनी आपल्या विद्यार्थ्यांना प्रसूती विभागात येताना हात स्वच्छ धुऊन येण्याचा नियम घालून दिला.

नियम पाळल्याने मार्च ते ऑगस्ट 1848 दरम्यान डॉ. इग्नाज यांच्या विभागात एकाही महिलेचा प्रसूतीनंतर संसर्गाने मृत्यू झाला नाही. बाळंतपणानंतरचा मातांचा मृत्यू दर सरासरी 18 टक्केवरून 1 टक्का इतका खाली आला. त्यांचे संशोधन त्यांच्या विद्यार्थ्यांनी स्वीकारले, परंतु वरिष्ठ व वैद्यकीय क्षेत्रातील इतर डॉक्टरांनी अस्वीकार केले.

1849 साली डॉ. इग्नाज यांना पदावरून काढण्यात आले. डॉ. इग्नाज यांनी नोकरी नसताना बाळंतपणानंतरच्या संसर्गावर व्याख्याने देऊन जनजागृती सुरू केली. 1850 साली बुडापेस्ट येथील रुग्णालयात संसर्गाचा मोठा प्रकोप झाला. डॉ. इग्नाज यांना प्रसूती विभागाची जबाबदारी दिल्याने मृत्यूदरात प्रचंड घट झाली. संसर्गाचा प्रकोप इतरत्र 15 टक्के होता तर डॉ. इग्नाज कार्यरत असलेल्या बुडापेस्ट येथे 0.85 टक्के इतका अत्यल्प होता. व्हिएन्ना येथे डॉ. इग्नाज यांच्या संशोधनावर टीका होऊ लागली. डॉ. इग्नाज यांनी 1861 साली आपल्या संशोधनावर आधारित पुस्तक लिहिले. जगभरात त्यांनी मांडलेला स्वच्छतेचा सिध्दांत फेटाळण्यात आला. डॉ. इग्नाज यांच्या संशोधनाला होत असलेला विरोध आणि टीकेने त्यांची मानसिक स्थिती प्रचंड खालावली. त्यांना मनोरुग्णालयात दाखल करण्यात आले तिथेच 13 ऑगस्ट 1865 रोजी त्यांचे दुर्दैवी निधन झाले.

काही दिवसांपूर्वी केलेल्या एका शस्त्रक्रियेदरम्यान त्यांच्या उजव्या हाताला झालेल्या जखमेतून विषाणूचा संसर्ग झाल्याचा उल्लेख आढळतो. ज्या रोगाच्या विरोधात आयुष्यभर डॉ. इग्नाज झटले त्यानेच त्यांचा मृत्यू होणे यापेक्षा दुसरी मोठी शोकांतिका नाही. डॉ. इग्नाज यांच्या मृत्यूच्या दोन दशकांनी वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांच्या संशोधनाला मान्यता प्रदान केली. डॉ. इग्नाज यांचे संशोधन तेव्हाच गांभीर्याने घेतले गेले असते तर आज भूतकाळातील चुकांसाठी हळहळ व्यक्त करण्याची वेळ आली नसती. डॉ. इग्नाज यांनी वेळीच बाळंतीण मातांच्या शल्याची चिकित्सा केली, दुर्दैवाने वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवरांना मात्र वेळीच डॉ. इग्नाज यांचे संशोधन आणि शल्याचे निदान करता आले नाही.

[email protected]