
रविवारी 21 मार्च जागतिक वन दिन म्हणून साजरा करण्यात आला. जागतिक वन दिनाच्या पार्श्वभूमीवर वर्धा जिह्याच्या सेलू तालुक्यातील केळझर येथे एका वाघाचा मृत्यू झाला आहे. केळझर येथील पीर बाबा टेकडीजवळ पाण्यात वाघाचा मृतदेह आढळून आला आहे. वाघाचे वय 4 वर्ष असल्याचे सांगितले जात आहे.
मृत वाघ मादी जातीचा असल्याची वन विभागाच्या माहितीतून स्पष्ट झाले आहे. केळझर परिसरातील नागरिकांना वाघाचा मृतदेह दिसताच एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळावर पोहचले. प्राथमिक अंदाजातून विजेचा करंट लागून या युवा वाघिणीचा मृत्यू झाल्याचे म्हटले जात आहे. रविवारी पहाटे सात वाजता ग्रामस्थांना वाघिणीचा मृतदेह आढळला. गेल्या 78 दिवसांत 11 वाघांचा विदर्भात मृत्यू झाला आहे. त्यामुळे वन विभागापुढे मोठे आव्हान उभे ठाकले आहे.



























































