वणवा लावणाऱया मुख्याध्यापकासह शिक्षिकेला 5 हजार रुपये दंडाची शिक्षा, वाई न्यायालयाचा निकाल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वाई तालुक्यातील रेणावळे परिसरात वणवा लावल्याप्रकरणी दोषी धरून वाई न्यायालयाने रेणावळे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षिकेस प्रत्येकी पाच हजार रुपये दंड व दंड न भरल्यास 20 दिवसांची साधी कैद अशी शिक्षा सुनावली.

रेणावळे येथील शाळेचे मुख्याध्यापक शिवाजी लक्ष्मण पारटे (रा. वेलंग) व शिक्षिका नीलिमा गणेश खरात (हल्ली रा. रेणावळे) यांनी 26 फेब्रुवारी 2021 रोजी शाळेच्या परिसरात कचरा व कागद जाळण्यासाठी आग लावली. त्यातील कागद व पालापाचोळा वाऱयाने उडून लगतच्या मालकी क्षेत्रात जाऊन तेथील मोठय़ा प्रमाणात असलेल्या गवताने पेट घेतला. ही आग पसरत जाऊन राखीव वनक्षेत्रात वणवा लागला. वनाधिकारी व वन कर्मचाऱयांनी वेळीच दक्षता घेऊन भरउन्हात हा वणवा विझवला. या वणव्यामध्ये 22 हेक्टर वनक्षेत्राचे नुकसान झाले.

याप्रकरणी शिवाजी पारटे व नीलिमा खरात यांच्यावर वनगुन्हा नोंद करण्यात आला होता. उपवनसंरक्षक भारतसिंग हाडा, सहायक वनसंरक्षक (वनीकरण) गोसावी, वनपरीक्षेत्र अधिकारी महेश झांजुर्णे यांच्या मार्गदर्शनाखाली तत्कालीन वनपाल (वाशिवली) भाऊसाहेब कदम, प्रभारी वनपाल रत्नकांत शिंदे यांनी वनरक्षक संदीप पवार, प्रदीप जोशी यांच्या मदतीने या गुह्याचा तपास पूर्ण करून आरोपींविरुद्ध 13 मार्च रोजी वाई न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. दोन्ही आरोपींनी गुन्हे कबूल केले. त्यानंतर न्यायालयाने त्यांना शिक्षा सुनावली.