
आयडियल स्पोर्टस् ऍकॅडमी व राष्ट्रीय मिल मजदूर संघ आयोजित ऑनलाईन विनाशुल्क अखिल हिंदुस्थानी बुध्दिबळ स्पर्धेत चेन्नईच्या ग्रँड मास्टर आर.आर. लक्ष्मनने विजेतेपद पटकाविले. मुंबई शहर जिल्हा बुध्दिबळ संघटना व इन्स्टिटयूट फॉर चेस एक्सलन्ट यांच्या सहकार्याने अरेना पद्धतीने लीचेस प्लॅटफॉर्मवरील आयोजित स्पर्धेत ग्रँड मास्टर लक्ष्मनने दोन तासात सर्वाधिक 102 गुण नोंदवीत निर्विवाद वर्चस्व राखले.
उपविजेतेपदासाठी चुरस होऊन पश्चिम बंगालच्या इंटरनॅशनल मास्टर सायंतन दासला (87 गुण, तृतीय क्रमांक) उत्तम सरासरीच्या बळावर मागे टाकत 87 गुणांसह दिल्लीच्या फिडे मास्टर आर्यन वार्ष्णेयने बाजी मारली. एकमेव मुंबईच्या अमरदीप बारटक्केने टॉप-10 मध्ये स्थान मिळविले.
आयडियल स्पोर्टस् ऍकॅडमीचे कार्याध्यक्ष गोविंद मोहिते यांनी सचिन अहिर यांच्या वाढदिवशी क्रीडा स्पर्धेचे सातत्य कायम राखण्यासाठी यंदा राष्ट्रीय स्तरावर ऑनलाईन मोफत बुध्दिबळ स्पर्धा आयोजित केले.




























































