
बीड जिल्ह्यात सोमवारी रात्री आणि मंगळवारी पहाटेपासून सुरू झालेल्या अवकाळी पावसाने चांगलेच झोडपले. अवकाळी पावसाने रब्बी पिकांसह फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. गेवराई तालुक्यात टरबूज, कांद्याचे नुकसान झाले.
राजापूर येथे 400 कोंबड्या अवकाळी पावसाने दगावल्या तर पाटोद्यात वीज पडून एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. शिरूरला दुपारीही पावसाने झोडपले.
गेल्या तीन दिवसापासून सुरू असलेल्या अवकाळी पावसाने प्रचंड नुकसान झाले आहे. मंगळवारी पहाटेपासून जोरदार पावसाने हजेरी लावली. विजेच्या कडकडाटासह सुरू झालेल्या पावसाने शेतीला मोठा फटका बसला आहे. रब्बी पिके आडवी झाली आहेत. फळबागांचेही जिल्हाभरात नुकसान झाले आहे. गेवराई तालुक्यात टरबुजाचे मोठे नुकसान झाले आहे.
निपाणी जवळ कांद्याचे नुकसान झाले आहे. तर राजापूर येथे एका शेतकऱ्याच्या 400 कोंबड्या अवकाळी पावसाने दगावल्या आहेत. केज तालुक्यातही रात्री पावसाने हजेरी लावली. आष्टी आणि शिरूरमध्ये मंगळवारी दुपारनंतर पावसाला जोर आला. बीड तालुक्यातही मध्यरात्रीपासून पावसाने धुमाकूळ घातला. माजलगावमध्ये सकाळच्या टप्प्यात पावसाचा जोर जास्त होता.
गेवराई तालुक्यात 48 गावांना फटका
गेवराई तालुक्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने झोडपले असून यामुळे गेवराई तालुक्यातील 184 गावांपैकी 48 गावांना या अवकाळी पावसाचा जबर फटका बसला असून यामध्ये 400 कोंबड्यांची जिवितहानी देखील या अवकाळी पावसामुळे झालेली आहे. तसेच गहू, हरभरा व इतर पिकासह फळबागांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी आस्मानी संकटात सापडला आहे. गेवराई तालुक्यात गेल्या तीन दिवसापासून अवकाळी पावसाने चांगलाच कहर केला असून वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाटाने गेवराई तालुक्याला झोडपून काढले आहे.
अवकाळी पावसामुळे गेवराई तालुक्यातील दहा मंडळामधील सात मंडळात 33 टक्के कमी नुकसान झाले असून तीन मंडळात यामध्ये चकलांबा मंडळांमधील 14 गावे, जातेगाव मंडळामधील 19 गावे तर तलवाडा मंडळामधील 15 गावे या गावांना 33 टक्के पेक्षा जास्त पिकाचे नुकसान झाले असून तलवाडा मंडळांमध्ये 400 कोंबड्यांची जिवितहानी देखील झाली आहे. तसेच गहू, हरभरा व इतर पिकाचे तसेच फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर तलवाडा सर्कलमध्ये गंगथडी पट्टा असल्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात टरबुजाची लागवड होत असते. या अवकाळी पावसामुळे तलवाडा सर्कलमधील टरबुजांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर निपाणी जवळका येथे कांद्याचे पिकाचे बी उत्पादन करण्याचे मोठे प्रमाण असते या अवकाळी पावसामुळे कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून यामुळे शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात आर्थिक हानी झाली आहे. या आस्मानी संकटामुळे पुन्हा शेतकरी संकटात सापडला आहे.
पाटोद्यात वीज पडून एकाचा जागीच मृत्यू
सोमवारी रात्री उशिरा सुरू झालेल्या पावसात तालुक्यातील पारगाव घुमरा येथे वीज अंगावर पडून मध्यरात्री शहाजी भुजंग भोसले (वय अंदाजे 55)यांचा जागीच मृत्यू झाला. सोमवारी संध्याकाळी ढगाळ वातावरणानंतर पारगाव घुमरा येथे विजेचा कडकडाटासह जोरदार पाऊस सुरू झाला. शहाजी भुजंग भोसले हे आपल्या शेतामध्ये त्यांच्या गोठ्याकडे निघाले असता त्यांच्या अंगावर वीज पडल्याने जागीच मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी, भाऊ, मुले असा परिवार आहे.




























































