
गेल्या काही दिवसांपासून दहिसर, बोरिवली आणि आसपासच्या परिसरात कोरोनाची रुग्ण संख्या वाढत चालली आहे. याची गंभीर दखल घेत दहिसर येथील कोविड सेंटर पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिकेने घेतला आहे. त्याबरोबरच स्थानिकांसाठी खासगी रुग्णालयांमध्ये 80 टक्के खाटा आरक्षित ठेवण्याबाबत ही कार्यवाही करण्यात येणार असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले आहे.
वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना विभाग क्र. 1 मध्ये शिवसेना नगरसेवक व महापालिका अधिकारी समन्वय बैठक नुकतीच संपन्न झाली. या बैठकीत वरील निर्णय घेण्यात आला आहे. प्रभाग समिती अध्यक्ष सुजाता पाटेकर यांच्या अध्यक्षतेखाली, शिवसेना विभागप्रमुख, आमदार विलास पोतनीस यांच्या मार्गदर्शनाने पालिकेच्या विभागीय कार्यालयात ही बैठक संपन्न झाली.
यावेळी महानगरपालिकेतर्फे सुरू असलेल्या टेस्टिंग, ट्रेसिंग ट्रकिंग या प्रणालीचा आढावा घेण्यात आला. यावेळी शिक्षण समिती अध्यक्षा संध्या दोशी, नगरसेवक बाळकृष्ण ब्रीद, संजय घाडी, हर्षद कारकर, शीतल म्हात्रे, रिद्धी खुरसंगे, गीता सिंघण, तेजस्वी घोसाळकर, महानगरपालिका उपायुक्त विश्वास शंकरवार, सहायक मनपा आयुक्त भाग्यश्री कापसे, संध्या नांदेडकर, विभाग संघटक सुजाता शिंगाडे उपस्थित होते.
- या बैठकीत खासगी रुग्णालयातील खाटा 80 टक्के खाटा आरक्षित करणे, विलगीकरण केंद्र पुन्हा सुरू करणे, कोविड रुग्ण मिळालेल्या विभागात प्रभावीपणे सॅनिटायझेशन करणे इत्यादी उपाययोजना तातडीने करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.
- याबरोबरच विभागात जास्तीत जास्त लसीकरणाचे उद्दिष्ट गाठण्यासाठी प्रत्येक प्रभागात लसीकरण केंद्र वाढविण्यासंबंधी अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांच्याशी सकारात्मक चर्चा करण्यात आली.






























































