रोशन लोखंडे टोळीविरूद्ध मोक्कानुसार कारवाई, पोलीस आयुक्तांकडून कारवाईचा धडाका सुरूच

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पुणे शहरातील कायदा सुव्यवस्था मजबूत करण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली आहे. सराईत टोळ्यांविरूद्ध मोक्कानुसार कारवाईचा बडगा उगारला जात आहे. त्यानुसार आता सिंहगड रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतंर्गत सराईत टोळीप्रमुख रोशन लोखंडेसह साथीदारांविरूद्ध मोक्कानुसार कारवाई करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या आदेशानुसार टोळीविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे.

रोशन दयानंद लोखंडे (वय 21, रा. मानाजीनगर, नऱ्हे), प्रसाद अर्जुन धावडे (वय 20, रा. नांदेडगाव), वैभव अरूण तिडके (वय 21 मानाजीनगर, नऱ्हे), पवन सुग्रीव बिराजदार (वय 24, नऱ्हेगाव), फैजल फिरोज काझी (वय 21, रा. नऱ्हे) अशी मोक्कानुसार कारवाई करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

लोखंडे टोळीविरुद्ध नागरिकाला अडवून लुटमार करणे, कोयत्याचा धाक दाखवून जबरदस्तीने पैसे काढून घेणे, तडीपार असतानाही शहरात येउन हातात कोयता, बनावट पिस्तुल घेऊन डान्स करणे, खंडणी मागून पैसे उकळणे असे गुन्हे दाखल आहेत. मुख्य आरोपी रोशन लोखंडे याच्या सांगण्यावरून इतर आरोपींनी एकत्रित येऊन गुन्हे केले आहेत.

सराईत रोशनविरूद्ध 2016 पासून विविध गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे संबंधित टोळीविरुद्ध मोक्कानुसार कारवाई करण्याचा प्रस्ताव सिंहगडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देवीदास घेवारे यांनी पोलीस उपायुक्तांकडे पाठविला होता. त्यानंतर अपर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे यांनी त्यास मंजुरी दिली आहे.

पोलीस आयुक्तांचे गुन्हेगारांवर मोक्का टारगेट

शहरात कायदा सुव्यवस्था बिघडविणाऱ्यांविरूद्ध पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी कडक कारवाईचे धोरण स्वीकारले आहे. त्यामुळे पदभार स्वीकारल्यापासून त्यांनी आतापर्यंत तब्बल 21 मोक्का कारवाया केल्या आहेत. त्यामुळे गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत.