
छत्रपती शिवरायांचा जाज्वल्य इतिहास भावी पिढीसमोर उभा रहावा व त्यातून प्रेरणा मिळावी. तसेच सदाशिवगडाच्या ऐतिहासिक वैभवात भर पडावी, विभागाला पर्यटनस्थळाचा दर्जा प्राप्त व्हावा, यासाठी छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या ऐतिहासिक किल्ले सदाशिवगडावर वनपर्यटन योजनेतून ‘शिवसृष्टी’ प्रकल्प साकारण्यात यावा, अशी मागणी पाच गावांनी केली आहे. ऐतिहासिक महत्व वृद्धींगत करणाऱ्या ‘शिवसृष्टी’ प्रकल्पासाठी आवश्यक तो पाठपुरावा करण्याचे आश्वासन सहकार पणन तथा पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिले आहे.
पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांना याबाबत मागणीपत्र देण्यात आले. किल्ले सदाशिवगडाचे ऐतिहासिक महत्व वृद्धींगत व्हावे यासाठी वन विभागाच्या वनपर्यटन योजनेत गडाचा समावेश व्हावा. वनपर्यटन योजनेतून गडावर शिवसृष्टी प्रकल्प साकारण्यात यावा. या प्रकल्प अंतर्गत गडाची तटबंदी, बुरूज व प्रवेशव्दाराची निर्मिती करण्यात यावी. शिवरायांच्या जन्मकाळापासून राज्याभिषेकापर्यंतचे इतिहासातील प्रमुख प्रसंग शिल्प व चित्ररूपात साकारण्यात यावीत. शिवसृष्टी पाहिल्यानंतर शिवप्रेमी, गडप्रेमी व नवीन पिढीसमोर छत्रपती शिवरायांचा इतिहास उभा राहील. गडावर शिवसृष्टी प्रकल्प साकारल्यास राज्यासह परराज्यातून शिवप्रेमी व पर्यटक किल्ले सदाशिवगडाला भेट देतील. यामुळे सदाशिवगड विभागातील पर्यटन वाढीस मदत होणार आहे.
रस्त्याच्या सर्व्हेचे काम पुर्णत्वाकडे
गडावर प्राचीन सदाशिवाचे मंदिर आहे. पायथ्याला राहणाऱ्या हजारो शिवभक्तांना प्रकृतीच्या कारणामुळे सदाशिवाच्या दर्शनापासून वंचित रहावे लागत आहे. त्यामुळे सदाशिवगडावर रस्ता करावा, अशी मागणी पाच गावांनी केली होती. याची दखल घेत पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या सूचनांनुसार रस्ते विकास मंडळाने संपर्ण गडाचा ड्रोनव्दारे सर्व्हे केला असून राजमाची व बाबरमाची बाजूकडून रस्त्यांची आखणी केली आहे. शासनाच्या निकषानुसार सोपा व सुरक्षित रस्त्याची शासनाच्यावतीने निवड करण्यात येणार आहे.






























































