
मुंबईतील वाढत्या कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी आता लक्षणे नसलेल्या, कमी लक्षणे असल्याने होम क्वारंटाइन करण्यात आलेल्या रुग्णांनाही घरात मास्क घालणे, हातात ग्लोव्हज घालणे तसेच पल्स ऑक्सिमीटर, डिजिटल थर्मामीटर, सॅनिटायझर ठेवणे बंधनकारक केले असून होम क्वारंटाइनची मुदत 14 दिवसांवरून 10 दिवस करण्यात आली आहे. होम क्वारंटाइन रुग्णांसाठी मुंबई महापालिकेने आज सुधारित गाईडलाईन जारी केली. होम क्वारंटाइन असणाऱया कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांवरील निर्बंध अधिक कडक करण्यात येत आहे. पालिकेच्या मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी आज याबाबतचे परिपत्रक जारी केले.
…तर रुग्णालयात दाखल करणार
होम क्वारंटाइन असलेल्या व्यक्तीला श्वास घेण्यास त्रास होत असेल, शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी झाले असेल, ताप वाढला असेल, जिने चढता-उतरताना त्रास होत असेल, सतत छातीत दुखत असेल, अशक्तपणा किंवा शरीरातील एखादा अवयव सुन्न पडत असेल त्याचबरोबर शरीरातील इतर अवयवांचे कार्य सुरळीत चालत नसेल तर अशा रुग्णाला रुग्णालयात दाखल करावे, असे निर्देश पालिकेने दिले आहेत.
- होम क्वारंटाइनदरम्यान रुग्णाला सलग तीन दिवस ताप न येणे आणि 7 दिवस स्वतः काळजी घेणे बंधनकारक आहे. त्यानंतरच होम क्वारंटाइनमधून मुक्तता होऊ शकते.
- 10 दिवसांचे होम क्वारंटाइन संपल्यानंतर कोरोना आहे की नाही यासाठी कोणतीही वेगळी चाचणी करण्याची आवश्यकता नाही. z होम क्वारंटाइन असलेल्या एकूण रुग्णांपैकी किमान 10 टक्के रुग्णांच्या घरी वैद्यकीय पथकाने दररोज आळीपाळीने भेटी देऊन सर्व पडताळणी करण्यात येणार आहे. रुग्ण किंवा संबंधितांनी नियमांचे उल्लंघन केल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे.
































































