कोरोनाची दुसरी लाट! विद्यार्थी, पालक पुन्हा मूळ गावी जाण्याच्या तयारीत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई, पुणेसारख्या शहरात कोरोनाने पुन्हा डोके वर काढले असून वाढता प्रादुर्भाव पाहता विद्यार्थी, पालक पुन्हा गावी जाण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे पालकांकडून वार्षिक परीक्षा कधी होणार, निकाल कधी लागणार, नवीन प्रवेशप्रक्रिया कधीपासून असेल अशी विचारणा शाळांकडे सुरू केली आहे.

शैक्षणिक वर्ष 2020-21 संपले असून ऑनलाईन शिक्षणावर आधारित पहिली ते नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांच्या वार्षिक परीक्षा कशा घेणार, या विद्यार्थ्यांचा निकाल, त्यांचा पुढील वर्गातील प्रवेश याविषयी शालेय शिक्षण विभागाने कोणत्याच सूचना न दिल्याने मुख्याध्यापक, शिक्षकांसह पालकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.

मुंबईसारख्या शहरात पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून अनेक कुटुंबियांनी मूळ गावी जाण्याचा निर्णय घेतला आहे. पालकांना शाळेच्या वार्षिक परीक्षेच्या निर्णयाची प्रतीक्षा असून त्यानंतर लगेचच लॉकडाऊनसारखे निर्बंध लागू होण्याच्या आधीच गावी जाण्याचा अनेकांचा विचार आहे.

शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी

कोरोनामुळे घाबरलेल्या पालकांनी पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली आहे. ही परीक्षा 23 मे रोजी होणार आहे. मात्र परीक्षा देणाऱया विद्यार्थ्यांचे वय लक्षात घेता या परीक्षा जुलैमध्ये घेण्यात याव्यात अशी मागणी शिक्षक परिषदेचे शिवनाथ दराडे यांनी केली आहे.