सहकाऱयांशी अदबीने बोला; अपशब्द वापरून बोलल्यास होणार कारवाई

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कामात काही चुका किंवा इकडे तिकडे होत असतेच. त्यामुळे अशा परिस्थितीत वरिष्ठांनी आपल्या सहकाऱयांशी थेट अपशब्दांचा वापर करून बोलू नये. प्रत्येकाला स्वाभिमान असतो याचे भान ठेवून त्याला ठेच पोहचेल अशी भाषा वापरू नये. वरिष्ठांनी तारतम्य बाळगून चांगल्या भाषेतच बोलावे. जर कोणी वरिष्ठ आपल्या सहकाऱयांशी अपशब्द वापरून बोलला आणि त्यामुळे अधिकारी किंवा अंमलदाराने त्यांना अपमानास्पद वागणूक दिल्याची तक्रार केल्यास संबंधित पोलीस अधिकाऱयावर आता कारवाई करण्यात येणार आहे.

पोलीस ठाणे असो अथवा विविध कक्ष, तेथे मोठय़ा संख्येने अधिकारी, कर्मचारी एकत्र काम करीत असतात. त्यामुळे त्यांच्यात एकी आणि एकमेकांबद्दल आपुलकी असणे खूप गरजेचे असते. परंतु बऱयाचदा अधिकारी आपल्या सहकाऱयांशी बोलताना अपशब्दांचा सर्रास वापर करताना दिसतात. यामुळे सहकाऱयांमध्ये वरिष्ठांबद्दल  तुच्छतेची भावना निर्माण होते आणि त्याचा विपरीत परिणाम दैनंदिन कामकाजावर होतो. वरिष्ठांनी गोडीगुलाबी तर कधी कठोर होत सहकाऱयांकडून काम करून घेणे अपेक्षित असते. परंतु वरिष्ठांकडून अपशब्द वापरले गेल्याने सहकारी दुखावले जातात आणि ही बाब पोलीस दलाच्या दृष्टीने योग्य नसल्याने वरिष्ठ पोलीस अधिकाऱयांनी याची गंभीर दखल घेतली आहे. यापुढे सहकारी अधिकारी व अंमलदारांशी सौजन्याने वागावे आणि सर्वांशी अदबीने बोलावे. कोणीही अपशब्दांचा वापर करणार नाही. जर कोणी अधिकारी किंवा अंमलदाराने त्यांना अपमानास्पद वागणूक दिल्याचे तक्रार केल्यास संबंधित अधिकाऱयावर कारवाई करण्यात येणार असल्याचे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱयाने सांगितले.