
मासिक पाळीचा काळ हा काही तरुणी किंवा महिलांसाठी अतिशय त्रासदायक असतो. यावेळी पोटदुखी, कंबरदुखी, मूड स्विंग होणे, अंग जड होणे, काहीही खाऊ नये असे वाटणे अशा अनेक तक्रारी उद्भवतात. काही जणींची मासिक पाळी तर अनियमितही असते. अशा समस्यांवर हमखास आराम मिळवून देणारे काही सोपे घरगुती आयुर्वेदिक उपाय करून बघू शकता.
या काळात काही महिलांना क्रॅम्प्स येतात. अशा वेळी दुखणे कमी करण्याकरिता सकाळच्या वेळी भिजवलेल्या काळ्या मनुका आणि केसर यांचे रिकाम्या पोटी सेवन करावे. हा मासिक पाळीतले दुखणे दूर करणारा पारंपरिक उपाय आहे.
दुखणे दूर करण्याकरिता आलं अतिशय गुणकारी मानले जाते. त्यामुळे पाळीच्या दरम्यान आल्याचा आहारात समावेश करावा. आल्याचे छोटे-छोटे तुकडे पाण्यात टाकून उकळावेत. हे उकळलेले पाणी कोमट झाल्यावर प्यावे. यामुळे पोटदुखी दूर होते.
पाळीच्या वेळी डार्क चॉकलेट खाणे फायदेशीर आणि आरामदायी ठरते. कारण डार्क चॉकलेटमध्ये मॅग्नेशियम आणि आयर्न भरपूर प्रमाणात असते. या चॉकलेटमध्ये असलेल्या पोषक तत्त्वांमुळे पिरियड्स क्रॅम्प्स दूर व्हायला मदत होते.
बहुतांश महिलांना पाळीच्या वेळी गॅस, अॅसिडिटी होते. अशा वेळी चिमूटभर हिंग कोमट पाण्यात मिसळून प्यायल्याने फायदा होतो. यामुळे गॅस, अॅसिडिटीसारखे त्रास दूर होतात.




























































