सर्वसाधारण रुग्णालयांत 67 डॉक्टरांची थेट भरती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई महापालिकेच्या मुख्य रुग्णालयांवरील ताण कमी करून सर्वसाधारण रुग्णालयांत सुविधा वाढवण्यासाठी सर्वसाधारण रुग्णालयांतील सीनियर आणि ज्युनियर कन्सलटंटची विविध 68 पदे भरली जाणार आहेत. ही भरती थेट मुलाखतीमार्फत होणार आहे. त्यामुळे उपनगरातील रुग्णांना मोठा दिलासा मिळणार असून रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांचे मुंबईतील हेलपाटे थांबणार आहेत.

मुंबईतील पालिकेच्या केईएम, नायर, शीव तसेच कूपर या मुख्य रुग्णालयांत मुंबई तसेच देशभरातून रुग्ण येत असतात. अत्यंत माफक दरात त्यांच्यावर दर्जेदार उपचार केले जातात. मुंबई उपनगरात राहणारे लाखो लोकही या रुग्णालयांमध्ये उपचारांसाठी मुंबईत येत असतात. त्यात सध्या कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे मुख्य रुग्णालयांवरील ताण वाढला आहे. त्या पार्श्वभूमीवर पालिकेच्या भाभा (कुर्ला-वांद्रे), देसाई, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय, शताब्दी रुग्णालय, राजावाडी या सर्वसाधारण रुग्णालयांतील सीनियर आणि ज्युनियर कन्सलटंटची पदे भरण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. ही पदे भरली गेली तर मुंबईतील मुख्य रुग्णालयांतील रुग्णांची गर्दी कमी होणार असून त्यामुळे डॉक्टर तसेच आरोग्य कर्मचाऱयांवरील ताण कमी होणार आहे. सीनियर कन्सलटंटसाठी मासिक 2 लाख तर ज्युनियर कन्सलटंटसाठी दीड लाख रुपये मासिक वेतन देण्यात येणार आहे. मुलाखतीला 10 एप्रिलपासून सुरुवात होणार आहे. मात्र ही सर्व भरती कंत्राटी पद्धतीवर होणार आहेत.

तज्ञांची ही पदे भरली जाणार

  • मेडिसीन, सर्जरी,
  • ओबेसिटी-गायनॉलॉजिस्ट,
  • पेडियाट्रिक्स, अँनेस्थेसिया,
  • रेडिओलॉजी, ईएनटी,
  • ऑप्थेलमोलॉजी, पॅथॉलॉजी.

रुग्णालये

  • भाभा (कुर्ला) 9 पदे
  • भाभा (वांद्रे) 10
  • व्ही. एन. देसाई (सांताक्रुझ) 10
  • डॉ. आंबेडकर रुग्णालय (कांदिवली) 15
  • शताब्दी रुग्णालय (गोवंडी) 10
  • राजावाडी (घाटकोपर) 14