शेजारच्या राज्यांकडून ऑक्सिजन पुरवठा होऊ दे, राजेश टोपे यांची केंद्रीय आरोग्य मंत्र्यांकडे मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाराष्ट्र राज्याने लसीकरणामध्ये आघाडी घेतली आहे. त्यामुळे केंद्र सरकारने राज्याच्या मागणीप्रमाणे लसींचा पुरवठा करावा. 25 वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण करावे, महाराष्ट्रात ऑक्सिजनची वाढती मागणी लक्षात घेऊन अन्य राज्यांकडून त्याचा पुरवठा करण्याबाबत केंद्र सरकारने आदेश द्यावेत, अशी मागणी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज केंद्रीय आरोग्यमंत्र्यांकडे केली.

केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी विविध राज्यांतील आरोग्यमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला आणि राज्यांमधील कोरोना स्थितीचा आढावा घेतला. त्यावेळी राजेश टोपे यांनी महाराष्ट्रात कोरोना नियंत्रणासाठी सुरू असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.

कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन राज्यात गेल्या काही दिवसांपासून दररोज चार लाखांहून अधिक जणांना लसीकरण केले जात आहे. राज्यातील लसी वाया जाण्याचे प्रमाणही खूपच कमी आहे. राज्यात सध्याचा लसींचा साठा लक्षात केंद्र सरकारकडून तातडीने मागणीप्रमाणे पुरवठा होणे गरजेचे आहे. कोवॅक्सिनची मागणी वाढल्याने त्याचाही अतिरिक्त पुरवठा करावा, असे राजेश टोपे यांनी सांगितले.

लसीकरणाला प्राधान्य

राज्यात सध्या रुग्णसंख्या आढळतेय त्यात 25 ते 40 वयोगटातील संख्या अधिक आहे. या वयोगटातील तरुणांना व्यवसायानिमित्त बाहेर पडावे लागते. ही बाब लक्षात घेऊन 25 वर्षांवरील लोकांचा समावेश लसीकरणाच्या प्राधान्य यादीत करण्याची मागणीही त्यांनी केले.

ऑक्सिजनचा उपयोग

राज्यात दररोज 1 हजार 200 मेट्रिक टन ऑक्सिजनचे उत्पादन होत असून त्यापैकी 80 टक्के वापर वैद्यकीय कारणासाठी करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

केंद्राकडून मार्गदर्शन

राज्यात नवीन स्ट्रेन आला आहे का, याबाबत राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्राकडून संशोधन होऊन मार्गदर्शन करण्यात यावे.

अधिकचा निधी

आरोग्य सेवेसाठी अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध होण्यासाठी राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानातून निधी द्यावा, व्हेंटिलेटर्सच्या 100 टक्के वापरासाठी तांत्रिक मार्गदर्शन आणि प्रशिक्षण द्यावे, असेही राजेश टोपे यांनी सांगितले.

मंगळवारची रुग्णसंख्या
राज्य
रुग्ण –  55469
मृत्यू – 297

मुंबई
रुग्ण – 10040
मृत्यू – 32

ठाणे  – 1903
नाशिक – 2839
पुणे – 6558
संभाजीनगर – 946
नागपूर – 2668
नवी मुंबई – 1319
डोंबिवली – 1365
पनवेल – 581